सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 69 जणांवर दंडात्मक कारवाई

सोलापूर: महापालिका आयुक्त मा. शीतल तेली-उगले यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त श्री. रवि पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या, गुटखा व मावा सेवन करणाऱ्या तसेच लघुशंका करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली.

सहाय्यक आयुक्त श्री. शशिकांत भोसले यांच्या नेतृत्वाखालील या मोहिमेत शहरातील गड्डा कॉर्नर, रेल्वे स्टेशन परिसर, भवानी पेठ, गांधी नगर, अक्कलकोट रोड, विजापूर नाका, गुरुनानक चौक यांसारख्या अनेक सार्वजनिक ठिकाणी तपासणी करून थुंकणाऱ्या 69 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण ₹16,050/- दंड वसूल करण्यात आला.

यासोबतच, संबंधित पानटपरी धारकांना परिसराची स्वच्छता राखण्याचे आदेश देण्यात आले. प्लास्टिक बंदीचा देखील काटेकोर अंमल करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कठोर उपाययोजना राबविल्या. या मोहिमेत सफाई अधिकारी नागनाथ बिराजदार, अनिल चराटे तसेच आरोग्य निरीक्षक व अन्य महापालिका कर्मचारी सहभागी झाले होते.

महापालिकेच्या या उपक्रमामुळे शहरात स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.