11 फेब्रुवारीपासून 55 हजार विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

सोलापूर: विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या
बारावीच्या परीक्षेस मंगळवार 11 फेब्रुवारीपासून सुरुवात होत असून
यासाठी सोलापूर जिल्ह्यातून 55 हजार 879 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दहावीच्या परीक्षेस 21 फेब्रुवारीपासून प्रारंभ होत असून 65 हजार 585 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. या दोन्ही परीक्षा कॉपीमुक्त
वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन कडक अंमलबजावणी करणार आहे. दहावी आणि बारावी परीक्षेच्या अनुषंगाने
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांच्या
अध्यक्षतेखाली बुधवारी दक्षता समितीची बैठक झाली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि शिक्षणाधिकारी सचिन जगताप उपस्थित होते.
राज्याच्या मुख्य सचिवांनी तीन फेब्रुवारी रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक
घेऊन कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी
आवश्यक यंत्रणांचा वापर करण्याची सूचना त्यांनी केली होती. त्यानुसार 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या दरम्यान बारावी तर 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत होणार्या
दहावी परीक्षेसाठी कॉपीमुक्त अभियानाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. बारावी
परीक्षेसाठी 121 व दहावी परीक्षेसाठी 184 परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून या दोन्ही परीक्षांसाठी 26 परीरक्षक केंद्र (कस्टडी) आहेत.
त्यावर गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या
परीक्षा केंद्रांसाठी केंद्र संचालक नियुक्त करण्यात आले असून बारावीसाठी 34 व दहावीसाठी 47 संवेदनशील केंद्रे असल्याची माहिती
शिक्षणाधिकारी जगताप यांनी बैठकीत दिली. या केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त व
बैठे पथक नेमण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम 144 लागू करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी कॉपी चालते त्या संवेदनशील
केंद्रांवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून व्हिडिओग्राफीसाठी व्हिडिओग्राफर उपलब्ध
करून देण्यात येणार आहे. जिल्हाधिकार्यांमार्फत तालुकास्तरावर तहसीलदार व नायब तहसीलदार
यांच्याकडून फिरते पथक व बैठे पथक नेमले जातील. त्यामध्ये ग्रामसेवक, तलाठी व इतर अधिकार्यांचा समावेश असेल. जि.प.च्या मुख्य कार्यकारी
अधिकार्यांकडून जिल्हा परिषदेतील खातेप्रमुखांचे फिरते पथकही परीक्षा केंद्रांवर
लक्ष ठेवणार आहे. परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी विशेष आरोग्य सेवा
पुरविण्यात येणार असून त्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकार्यांना परीक्षा केंद्रांवर
बैठे आरोग्य पथक व तालुक्यात फिरते आरोग्य पथक नेमण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी
दिलेले आहेत.