"सर्वांसाठी घरे" ; घरकूल योजनेत 50 हजार रुपयांची वाढ: प्रत्येक घरावर सौर पॅनल बसवणार;

 

मुंबई :  महाराष्ट्रातील बेघर नागरिकांसाठी राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. 2024-25 च्या अर्थसंकल्पात घरकूल योजनेतील अनुदानात 50 हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे लाभार्थ्यांना अधिक आर्थिक मदत मिळणार आहे. महाराष्ट्र घरकूल योजनेच्या अंमलबजावणीत देशात अव्वल स्थानी आहे, अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. आतापर्यंत 44.07 लाख घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. राज्य सरकारने "सर्वांसाठी घरे" या उद्दीष्टाने आगामी पाच वर्षांसाठी नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करण्याचा निर्धार केला आहे. या धोरणांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, पीएम जनमन, रमाई आवास, शबरी आवास, पारधी आवास, अटल बांधकाम कामगार वसाहत, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास, मोदी आवास आणि धर्मवीर आनंद दिघे घरकुल यासारख्या विविध योजना राबविण्यात येणार आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्र प्रथम

प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत, 2024-25 मध्ये 20 लाख घरकुलांचे उद्दिष्ट ठरवले होते, त्यातील 18.38 लाख घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. यासाठी 14.71 लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्यासाठी 2,200 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य या योजनेच्या अंमलबजावणीत देशात पहिल्या क्रमांकावर आहे.

सौर ऊर्जेचा वापर – पर्यावरणपूरक पाऊल

राज्यात उभारण्यात येणाऱ्या सर्व घरकुलांच्या छतांवर सौर पॅनल बसवले जाणार आहेत. यामुळे वीजबिलाचा भार कमी होणार असून पर्यावरणपूरक ऊर्जा वापरण्याचे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना – शहरी 1 अंतर्गत 4.42 लाख घरकुलांना मंजुरी मिळाली असून 2.08 लाख घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित घरकुलांचे काम 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल. प्रधानमंत्री आवास योजना – शहरी 2.0 अंतर्गत पुढील पाच वर्षांत 5 लाख घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी 8,100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

हरित तंत्रज्ञानाला प्रोत्साहन

या योजनेंतर्गत नाविन्यपूर्ण बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर, हरित इमारतींची उभारणी आणि सौर ऊर्जा प्रणालीच्या स्थापनेसाठी विशेष अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे घरकुल योजना अधिक प्रभावी आणि शाश्वत होईल.