ठाण्यात 43 मीटर उंच ‘धर्मवीर आनंद दिघे’ स्मारक उभारणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

ठाणे – उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी
त्यांच्या राजकीय गुरूंच्या स्मृतिप्रित्यर्थ महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली
आहे. ठाण्यात शिवाजी मैदानाजवळ छत्रपती शिवाजी महाराज मैदानात ‘धर्मवीर आनंद दिघे
टॉवर’ उभारण्यात येणार असून त्यामध्ये आनंद दिघे यांचा 43 मीटर उंच ‘किंग साईज’ पुतळा असणार आहे. या
भव्य स्मारकासाठी सुमारे 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर
करण्यात आला आहे. या ठिकाणी उद्यान, सौंदर्यीकरण, दर्शनी सजावट, बैठक व्यवस्था आणि माहिती फलक
यांसारख्या सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. भूमिपूजन
सोहळ्यात एकनाथ शिंदे म्हणाले, “दिघे साहेबांचे ठाण्यासाठी
योगदान अमूल्य आहे. त्यांच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री पदावर पोहोचू शकलो.
त्यांच्या स्मृतीला अजरामर करण्यासाठी कोणतीही आर्थिक मर्यादा राहू दिली जाणार
नाही.” या स्मारक प्रकल्पाचा अंदाजे खर्च 15 कोटी रुपये असून
एप्रिल 2026 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात
आले आहे. दरम्यान, ठाणे पश्चिम रेल्वे स्थानक परिसराच्या
सौंदर्यीकरण प्रकल्पालाही शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या कामांमध्ये
रिक्षा व टॅक्सी स्थानकांचे नुतनीकरण, फुटपाथ दुरुस्ती,
माहिती फलक, झेब्रा क्रॉसिंग व लेन मार्किंग
करण्यात येणार असून सुमारे 4 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
हा प्रकल्प डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल.
कोण होते आनंद दिघे?
1990 च्या दशकात ठाण्यातील अत्यंत लोकप्रिय शिवसेना नेते म्हणून
आनंद दिघे यांची ओळख होती. बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिष्य आणि “हिंदू
हृदयसम्राट” म्हणून ते प्रसिद्ध होते. 2001 साली अपघातानंतर
झालेल्या हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने ठाणे
हादरून गेले होते. एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला सामान्य कार्यकर्ते म्हणून
राजकारणाला सुरुवात केली होती. आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनामुळेच शिंदे यांना
मोठी संधी मिळाली. या स्मारकाच्या उभारणीमुळे दिघे यांच्या कार्याची आठवण कायम
राहणार असून हे ठिकाण ठाणेकरांसाठी प्रेरणास्थान ठरेल, असा
विश्वास व्यक्त केला जात आहे.