तुळजाभवानी संस्थानच्या जमिनीवर 300 मेगावॉटचा सोलार प्रकल्प
.jpeg)
धाराशिव: तुळजाभवानीदेवी संस्थानच्या जमिनीवर 1350 कोटी रुपयांची
गुंतवणूक करून सुमारे 300 मेगावॉट क्षमतेचा सोलार प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
गुंतवणुकीसाठी देशभरातील नामवंत कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. यातून रोजगार
निर्मितीलाही मोठी चालना मिळणार आहे. या सोलार प्रकल्पाबाबत मंदिर समितीच्या
कार्यालयात गुंतवणुकीसाठी इच्छुक कंपन्यांनी सादरीकरण केले असल्याची माहिती
समितीचे विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. तुळजाभवानी देवीचे
मंदिर आणि शेकडो वर्षांपासून मंदिरात वेगवेगळ्या सेवा रुजू करणार्या मठाच्या
शाश्वत उत्पन्नात वाढ करण्याच्या अनुषंगाने मंदिर संस्थानच्या जागेवर सोलार
प्रकल्प उभारण्याबाबत ठराव संमत करण्यात आला होता. सोलार प्रकल्प उभारण्यासाठी
इच्छुक असलेल्या कंपन्यांकडून सादरीकरणासाठी प्रस्तावही मागविण्यात आले होते.
मंदिर समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत इच्छुक रिलायन्स, जुनीपर, जेएसडब्ल्यू, सॉलिटिस,
एनएचपीसी, टीयूव्ही यासारख्या नामांकित
कंपन्यांनी सादरीकरणात सहभाग घेतला. मंदिर
संस्थानकडे सुमारे 1500 एकर जमीन उपलब्ध आहे. या जागेवर 300 मेगावॉट क्षमतेचे
सोलार प्रकल्प उभे केले जाऊ शकतात. त्यातून तुळजाभवानी मंदिर संस्थान तसेच विविध
मठांना आर्थिक उत्पन्नाचा शाश्वत स्रोत उपलब्ध होणार आहे.