छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; शिल्पकार जयदीप आपटेला जामीन मंजूर
.jpeg)
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नौदल दिनाच्या
निमित्ताने 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
हस्ते या पुर्णाकृती पुतळ्याच अनावरण झालं होतं. मात्र अवघ्या आठ महिन्यातच हा
पुतळा कोसळला. यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं होतं. विरोधी पक्षाकडून
तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर मोठ्या प्रमाणात
टीका करण्यात आली होती. या घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचा
शिल्पकार असलेला जयदीप आपटेचा पोलिस शोध घेत होते. अखेर काही दिवसांनी त्याला अटक
करण्यात आली होती. मात्र आता जयदीपला आपटेला शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून
जामीन मंजूर करण्यात आला आहे.
आरोपीला कैदेत ठेवण्याची गरज नाही – कोर्ट न्यायाधीश एन.आर बोरकर
यांनी 25 हजार
रुपयांच्या जात मुचलक्यावर जयदीप आपटेला जामीन मंजूर केला. प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंर आता आरोपीला
कैदेत ठेवण्याची गरज नाही. याप्रकरणी कुणीही जखमी झालेलं नाही, त्यामुळे हत्येचा प्रयत्न केल्याचं कलम येथे लागू होत नाही, असं हायकोर्टाने म्हटलं आहे. आपटेला जामीन मंजूर करताना न्यायमूर्ती नितीन
बोरकर यांचं महत्त्वपूर्ण निरिक्षण नोंदवले आहे. याआधी 1 ऑक्टोबरला ओरसच्या सत्र न्यायालयाने त्याला जामीन नाकारला होता. जयदीप
आपटेने जामीन मिळवण्यासाठी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुतळा कोसळला असा दावा केला
होता. त्यानंतर वकील गणेश सोवानी यांच्या माध्यमातून त्याने उच्च न्यायालयाचे
दरवाजे ठोठावले. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी जयदीप आपटे विरोधात स्थानिक
पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. आरोपीवर विविध कलमं लावण्यात आली
होती.
नेमकं काय घडलं होतं?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर 4 डिसेंबर 2023 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाचे अनावरण करण्यात आले होते. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सोमवारी 26 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास कोसळला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा चौथरा 12 फुटांचा तर पुतळा 28 फूट उंच होता. हा पुतळा ब्राँझपासून बनवण्यात आला होता. तसेच पुतळ्याच्या बांधकामासाठी 2 कोटी 44 लक्ष खर्च करण्यात आला होता, अशी माहिती सामाजिक बांधकाम विभागाने दिली होती. या पुतळ्याचे काम नौदलामार्फत झाल्याचं राज्य सरकारने सांगितलं होतं.