कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी 20 ठार 100 हून अधिक जखमी, अमावास्येचे अमृतस्नान रद्द

प्रयागराज: मंगळवार-बुधवारी रात्री दीडच्या सुमारास प्रयागराजच्या संगम किनाऱ्यावर चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 20 हून अधिक जणांचा मृत्यू झाले 100 हून अधिक जखमी आहेत. समाज माध्यमावरील अपघात स्थळाचे फोटो पाहता मृतांचा आकडा दुर्दैवाने खूप मोठा असण्याची शक्यता आहे. मात्र, मृत किंवा जखमींची संख्या याबाबत प्रशासनाने कोणतीही माहिती दिलेली नाही.चेंगराचेंगरीनंतर प्रशासनाच्या विनंतीवरून सर्व 13 आखाड्यांनी आज मौनी अमावस्येचे अमृतस्नान रद्द केले आहे.  या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी तातडीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्याशी संपर्क करून परिस्थितीचा आढावा घेतला. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे अखिलेश यांच्या एक्स ट्विटर हँडल वरून प्रसारीत झालेले छायाचित्र हृदय द्रावक अहेत. दरम्यान, अपघातानंतर एनएसजी कमांडोंनी संगम तीरावर पदभार स्वीकारला. संगम नाक्यावर सर्वसामान्यांचा प्रवेश बंद करण्यात आला. गर्दी आणखी वाढू नये म्हणून प्रयागराज शहरातही भाविकांच्या येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यासाठी शहराला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज बुधवार, महाकुंभात मौनी अमावस्येला स्नान असून, त्यानिमित्त शहरात सुमारे ५ कोटी भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. रात्री उशिरापर्यंत संगमसह ४४ घाटांवर आठ ते दहा कोटी भाविक स्नान करतील, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.