ममता बॅनर्जींचा पक्षही फुटण्याचे संकेत, पश्चिम बंगालमध्ये होणार महाराष्ट्राची पुनरावृत्ती?

कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या मोठ्या हालचाली घडताना पाहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार शांतनू सेन आणि आमदार अराबुल इस्लाम यांना निलंबित करण्यात आले आहे. दोन्ही नेते पक्षविरोधी कारवाया करत असल्याचे सांगितले जाते व यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज होत्या. अखेर दोन्ही नेत्यांवर कारवाई करत पक्षाकडून त्यांना निलिंबत करण्यात आले आहे. शांतनु सेन हे अभिषेक बॅनर्जी यांच्या जवळचे मानले जातात. मात्र, मागील काही दिवसांपासून ममता बॅर्जी व अभिषेक बॅनर्जी यांच्यात आलबेल नसल्याचे सांगितले जाते. त्यातच आता अभिषेक बॅनर्जी यांच्या जवळच्या नेत्यावर कारवाई केल्याने तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पक्षांतर्गत दोन गट पडले आहेत. अभिषेक बॅनर्जी आणि ममता बॅनर्जींचा एक असे दोन गट पडल्याचे दिसून येते. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर निशाणा साधताना पाहायला मिळतात. शांतनू सेन यांनी आरजी कर प्रकरणात राज्यातील पोलिसांवर टीका केली होती. तसेच, अनेक मुद्यांवर राज्य सरकारच्या विरोधी भूमिका मांडली आहे. त्यांच्या पत्नी काकली सेन यांना देखील पक्षाच्या काही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून काढण्यात आले होते. दरम्यान,पक्षातील नेत्यांना शिस्त लावण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जाते. पश्चिम बंगालमध्ये 2026 ला विधानसभा निवडणुका होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच ममता बॅनर्जी यांनी अनेक शिस्तपालन समित्या स्थापन करत नेत्यांना विविध मुद्द्यांवर पक्षाच्या धोरणांच्या विरोधात जाण्यावरून इशारा दिला होता.