पोलिस भरतीत यश न आल्याने १९ वर्षीय तरुणाने विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना

कोल्हापूर : पोलिस भरतीत यश न आल्याने नैराश्येतून 19 वर्षाच्या तरुणाने विष प्राशन केल्याची घटना रंकाळा तलाव परिसरात घडली. तरुणाच्या हातातील बाटली काढून घेताना मैत्रिणीच्या तोंडावर विषारी द्रव्य पडल्याने तिलाही विषबाधा झाली. दोघांनाही उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे या घटनेचा तपास करीत आहेत. पन्हाळा तालुक्यातील संबंधित तरुण शहरातील एका करिअर ॲकॅडमीमध्ये पोलिस भरतीची तयारी करीत होता. काही महिन्यांपूर्वी झालेल्या भरतीमध्ये त्याचे मित्र पोलिस भरतीला पात्र ठरले. मात्र तरुणाला यश न आल्याने तो नैराश्य होता. शनिवारी (दि. 12) तो मैत्रिणीसमवेत रंकाळा तलाव परिसरात आला होता. अंबाई टॅक परिसरात त्याने नैराश्येतून विष प्राशनाचा प्रयत्न केला. यावेळी त्याच्या मैत्रिणीने तरुणाच्या हातातून विषाची बाटली हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत तिच्या चेहऱ्यावर विषारी द्रव्य उडाले. दोघांनाही अत्यवस्थ वाटू लागल्याने सीपीआरमध्ये दाखल झाले. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे