कर्नाटकात भीषण बस अपघात; १७ जणांचा होरपळून मृत्यू
चित्रदुर्ग (कर्नाटक) :
कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी पहाटे झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात
१७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. हिरियुर तालुक्यातील गोरलट्टू परिसरात खाजगी
स्लीपर बस आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेनंतर दोन्ही वाहनांना
भीषण आग लागली आणि अनेक प्रवासी बसमध्ये अडकले, त्यामुळे मृतांचा आकडा वाढल्याचे
सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हा अपघात
बुधवार आणि गुरुवारच्या मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास झाला. खाजगी
स्लीपर बस बेंगळुरूहून गोकर्णाकडे जात होती, तर समोरून
येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली. अपघातानंतर ट्रकचे काही भाग पूर्णपणे जळून खाक
झाले असून ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. बसमध्ये चालक, कंडक्टरसह
एकूण ३२ प्रवासी होते. धडकेनंतर बस आणि ट्रकला लागलेली आग काही क्षणांतच वेगाने
पसरली. त्यामुळे अनेक प्रवासी बसमधून बाहेर पडू शकले नाहीत आणि त्यांचा जागीच
दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच डीएसपी शिवकुमार घटनास्थळी दाखल झाले
आणि बचावकार्याचे नेतृत्व केले. स्थानिक नागरिक व अग्निशमन दलाच्या मदतीने आग
आटोक्यात आणण्यात आली. बस कंडक्टर मोहम्मद सलीम यांनी अपघाताबाबत माहिती देताना
सांगितले की, “मी झोपेत होतो. अचानक मोठा आवाज झाला, काच फुटली आणि मी बसमधून खाली पडलो. त्यानंतर काय घडले ते मला आठवत नाही.
काही लोकांनी मला रुग्णालयात नेले. माझ्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे.”
जखमी प्रवाशांना तत्काळ चित्रदुर्ग जिल्हा रुग्णालयात
दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील
उपचारांसाठी बेंगळुरूला हलवण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला
असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासात वेग किंवा
निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.