पिंपरी-चिंचवडमध्ये एका रात्रीत १०१ मिमी पाऊस – नवा विक्रम

पुणे : राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम असून, हवामान विभागाने पुढील ४८ तासांत वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात १० वर्षांतील विक्रम मोडला मंगळवारी पुणे शहरात मुसळधार अवकाळी पावसाची नोंद झाली. यामुळे मे महिन्यात गेल्या १० वर्षांचा विक्रम मोडला आहे. १ ते २१ मे दरम्यान पुण्यात ११० मिमी पाऊस पडला असून, याआधी २०१५ मध्ये १०६ मिमी पावसाची नोंद झाली होती. पुण्याचा मे महिन्यातील सरासरी पाऊस ३१.४ मिमी असतो. मात्र, आठवडाभर सुरू असलेल्या सरी आणि मंगळवारच्या मुसळधार पावसामुळे शंभरी पार झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये तर एका रात्रीत १०१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे शहरात गोंधळाचे चित्र मंगळवारी बावधन, बाणेर, कोथरूड, सिंहगड रस्ता, कात्रज, आंबेगाव, सहकारनगर या भागांमध्ये पावसाचा जोर दिसून आला. यामुळे अनेक मुख्य रस्त्यांवर पाणी साचले, तर काही भागांमध्ये वीजपुरवठाही खंडित करण्यात आला. बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण दिसले तरी पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. मात्र, यामुळे उकाडा वाढल्याचे जाणवत आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र कारणीभूत हवामान विभागाने सांगितले की, कर्नाटक किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. यामुळे हवेमधील बाष्पाचे प्रमाण वाढले असून, ते थेट जमिनीच्या दिशेने येत आहे. परिणामी, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यांसह पावसाचा जोर वाढला आहे. राज्यातील नागरिकांनी सतर्क राहावे पुढील ३ ते ४ दिवस पावसाचे असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.