महाकुंभमधील योगदानाबद्दल स्वच्छता कर्मचाऱ्यांना १०,००० रुपयांचा बोनस, योगी आदित्यनाथ यांची घोषणा

प्रयागराज :  महाकुंभमधील योगदान लक्षात घेऊन उत्तर प्रदेश सरकारने स्वच्छता कर्मचा-यांसाठी १०,००० रुपयांचा बोनस जाहीर केला. तसेच, पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि १६,००० रुपयांचे किमान वेतन लागू करण्याची घोषणा करण्यात आली प्रयागराज महाकुंभच्या समाप्तीनंतर प्रयागराज येथे दाखल झालेले उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्याऱ्यांना दहा हजार रुपये बोनस जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे स्वच्छता कर्मचाऱ्यांना किमान मासिक वेतन १६ हजार रुपये करण्यात आल्याची घोषणाही त्यांनी केली. महाकुंभ येथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. एप्रिल महिन्यापासून सर्व कर्मचाऱ्यांना हे लाभ मिळणार आहेत. आदित्यनाथ यांच्यासह उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक, केशवप्रसाद मौर्य, उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांच्यासह योगींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांसह भोजन केले.  महाकुंभ दरम्यान उत्तर प्रदेश सरकारने सर्वांत मोठे स्वच्छता अभियान राबविले होते. त्याची नोंद गिनेस बुक आफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली होती. त्याबाबतचा पुरस्कारही आज देण्यात आला.