अबू आझमी यांची माफी; वारीवरील वक्तव्यानंतर मागितली माफी
.jpeg)
मुंबई / सोलापूर –
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी पंढरपूर वारी संदर्भात
केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अखेर माफी मागितली आहे. त्यांनी आपल्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर पोस्ट करत स्पष्ट केले की, आपले वक्तव्य चुकीच्या पद्धतीने सादर झाले असून, आपला हेतू कधीही कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा
नव्हता.
अबू आझमी यांनी लिहिले:
"जर माझ्या वक्तव्यामुळे वारकरी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील, तर मी माझे शब्द पूर्णपणे मागे घेतो आणि सर्वांची माफी मागतो." त्यांनी सोलापूरमध्ये केलेल्या एका भाषणात वारीच्या पालखीसंदर्भात वक्तव्य केले होते, जिथे त्यांनी रस्ते जाम होण्याचा उल्लेख करत मुस्लिम समाजाच्या शासकीय वागणुकीविषयी असलेली नाराजी व्यक्त केली होती. या वक्तव्यानंतर राज्यभरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता. अनेक राजकीय नेत्यांनीही त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यांच्या मते, “माझं वक्तव्य तोडून मोडून आणि दुर्भावनापूर्ण पद्धतीने सादर करण्यात आले. मी वारी पालखीचा उल्लेख फक्त मुस्लिम समाजावरील भेदभाव दर्शवण्यासाठी केला होता. ती कोणत्याही प्रकारची तुलना नव्हती.”
आपल्या पोस्टमध्ये त्यांनी पुढे लिहिले आहे: "मी एक निष्ठावंत समाजवादी आहे. प्रत्येक धर्म, संस्कृती, सूफी संत आणि त्यांच्या परंपरांचा मी नेहमीच आदर केला आहे. वारी महाराष्ट्राच्या आंतरधर्मीय, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा अभिमानास्पद भाग आहे. मी त्याचा सन्मान करतो." त्यांनी स्पष्ट केलं की, आपली मागणी ही केवळ सरकारच्या दुटप्पी धोरणांविरोधात होती, जी अल्पसंख्यांक समाजाच्या मनात वेगळेपणाची भावना निर्माण करू शकते. मात्र, देशाच्या एकतेशी कोणतीही तडजोड होणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
वादग्रस्त विधान काय होते?
अबू आझमी यांनी पुण्यातून येताना पालखीसाठी रस्ता जाम होण्याचा उल्लेख करत म्हटले होते, "आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव साजरे होत असतील, याची तक्रार केली नाही. मला लोकांनी सांगितले लवकर निघा, अन्यथा पालख्यामुळे रस्ता जाम होईल. पण आम्ही कधी तक्रार केली नाही." या विधानावरून वाद निर्माण झाला आणि वारकरी समाजासह सर्वसामान्य जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली.