संगमेश्वर' चे शिवनेरी व आडराई जंगल येथे यशस्वी ट्रेकिंग

सोलापूर :-संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त) सोलापूर मधील संगमेश्वर ट्रेकिंग क्लबच्या वतीने शिवनेरी व आडराई जंगल ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व ८३  विद्यार्थी अशा एकूण १०३ ट्रेकर्सनी सहभाग घेतला. सर्व ट्रेकर्सनी ३५०० फुट उंच शिवनेरी किल्ला येथे ट्रेक यशस्वीपणे पूर्ण केला‌. शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान आहे. हा किल्ला तीन बाजूंनी उंच कड्यांनी वेढलेला त्रिकोणी आकाराचा असून, ऐतिहासिकदृष्ट्या त्याचे खूप महत्त्व आहे. किल्ल्यात अनेक पाण्याच्या टाक्या आणि विहिरी असून, त्याचे संरक्षण करण्यासाठी मजबूत तटबंदी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी याच किल्ल्यावर झाला, त्यामुळे याला ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व आहे.  या किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचे जन्मस्थान, शिवाई देवीचे मंदिर, गंगा - यमुना व इतर पाण्याच्या टाक्या, धान्याचे कोठार, बालेकिल्ला, हमामखाना, कडेलोट आदि ठिकाणे पाहून ट्रेकर्सनी किल्ल्याचा इतिहास जाणून घेतला.  त्यानंतर सर्व ट्रेकर्सनी खिरेश्वर येथील शंभू महादेवाचे दर्शन घेऊन आडराई जंगल ट्रेक यशस्वी पुर्ण केला. आडराई जंगल घनदाट असल्याने दिवसाही अंधारमय वातावरण असते म्हणून यास डार्क फॉरेस्ट असे म्हणतात. येथे हिरव्यागार टेकड्यांवरुन वाहत येणारे धबधबे आणि प्रचंड ढगांची गर्दी पहावयास मिळते. याठिकाणी अंजणी, कारवी, काटेकुंबळे इत्यादी हिरव्यागार वनस्पती, हरियाल,घुबड, कुरटूक हे पक्षी व ब्लु मॉरमॉन, इंडियन मून मोथ, अॅटलास मोथ ही फुलपाखरे  इत्यादी मोठ्या संख्येने आढळतात. या ठिकाणी प्रसिद्ध असलेला काळू धबधबा  व येथून उगम पावणारी काळू नदी, पिंपळगाव जोग धरणाचे विहंगम दृश्य, माळशेज घाट पाहिले. त्यानंतर पर्यावरणाचे संवर्धन करत सर्वांनी निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी रहावे.  या उद्देशाने  कॉलेजमध्ये 'संगमेश्वर ट्रेकिंग क्लबची' स्थापना सन २०२० मध्ये करण्यात आली आहे. क्लबने आतापर्यंत वासोटा, रतनगड, तिकोना, विसापूर, लोहगड, भाजे कार्ला लेणी, एकवीरा देवी, भोरगिरी, भिमाशंकर, कमळगड, अंधारबन आदी ठिकाणी व किल्ल्यांवर यशस्वीरित्या ट्रेकिंग केलेली आहेत.  यावर्षी पावसाळी ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते. क्लबचे समन्वयक डॉ. शिवाजी मस्के यांच्या नेतृत्वाखाली डॉ. संघप्रकाश दुड्डे, डॉ. दादासाहेब खांडेकर, डॉ. आण्णासाहेब साखरे, डॉ. बजरंग मेटील, प्रा. शिरीष जाधवप्रा. आनंद चव्हाण, प्रा. शिवराज पाटील, प्रा. मल्लीनाथ साखरे, प्रा. विक्रांत विभुते, प्रा. विश्वनाथ कक्कळमेली, प्रा. रिद्धी बुवा, डॉ. बापू राऊत, राहूल कराडेमोहन काळे, धनंजय बच्चाव, किसन धनगर, चन्नू सरसंबी, नागेश स्वामी, पंचमुखी करुटे यांच्यासह विद्यार्थ्यांनी हा ट्रेक उत्साहात पूर्ण केला. यासाठी कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांनी मार्गदर्शन केले.