लालपरीचा प्रवास महागणार? एसटी तिकीट दरवाढीबाबत मंत्री प्रताप सरनाईकांचे संकेत

इराण-अमेरिका संघर्षामुळे जागतिक स्तरावर इंधनाच्या किंमतींमध्ये वाढ झाली असून त्याचा परिणाम आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळावर (एसटी) दिसून येत आहे. वाढत्या डिझेल दरांमुळे एसटी महामंडळाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून भविष्यात तिकीट दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, एसटी महामंडळाला दररोज सुमारे १० लाख ८७ हजार लिटर डिझेलची आवश्यकता असते. इंडियन ऑईल कंपनीकडून डिझेल पुरवठा केला जात असून, मागील आठवड्यात डिझेलच्या दरात प्रतिलिटर ३ रुपयांनी वाढ झाली आहे. या वाढीमुळे एसटी महामंडळावर दररोज सुमारे ३३ लाख ७० हजार रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.

त्यामुळे एसटी महामंडळाला वर्षभरात सुमारे १२४ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. “जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती अधिक गंभीर झाली, तर इंधन दरांमध्ये आणखी वाढ होऊ शकते,” असेही सरनाईक यांनी नमूद केले. दरम्यान, तातडीने तिकीट दरवाढ होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. “केंद्र किंवा राज्य सरकारकडून विशेष सवलत मिळाल्यास तिकीट दरवाढ टाळता येईल. पुढील १० ते १२ दिवस परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. सरकारकडून आर्थिक मदत न मिळाल्यास एसटी तिकीट दर वाढवावे लागू शकतात,” असे त्यांनी सांगितले.

तसेच, ऑईल कंपन्यांनी पूर्वीच्या दरात डिझेल पुरवठा केल्यास तिकीट दरवाढीची गरज भासणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या बाईक टॅक्सी सेवांवरही कारवाई सुरू असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. काही ठिकाणी महिलांबाबत गैरप्रकार घडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने सायबर पोलिसांना कारवाईचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.