भगवा कुर्ता आणि टिळ्यासह सुवेंदू अधिकारी यांनी घेतली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल रवी यांच्या हस्ते त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. सुवेंदू अधिकारी भगवा कुर्ता आणि भगवा टिळा लावून शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहिल्याने त्यांच्या वेशभूषेची विशेष चर्चा रंगली. शपथ घेतल्यानंतर त्यांनी मंचावरील वरिष्ठ नेत्यांचे आशीर्वाद घेत समर्थकांचे अभिवादन स्वीकारले. या सोहळ्यात भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक किर्तनिया, खुदीराम टुडू आणि निशित प्रामाणिक यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. यापूर्वी केंद्रीय निरीक्षक अमित शाह आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन मांझी यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सुवेंदू अधिकारी यांची नेतेपदी निवड करण्यात आली होती. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने २९४ पैकी २०७ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले. तृणमूल काँग्रेसला ८० जागांवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसला २ आणि डाव्या पक्षांना १ जागा मिळाली.