सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या पूर्वनियोजित; हल्लेखोरांनी रेकी केल्याचा आरोप

भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे वैयक्तिक सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनंतर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेला अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक संबोधत सुवेंदू अधिकारी यांनी ही हत्या पूर्वनियोजित असल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, हल्लेखोरांनी दोन ते तीन दिवस रेकी करून सुनियोजित पद्धतीने हा हल्ला घडवून आणला. त्यांनी जनतेला कायदा हातात न घेण्याचे आवाहन करत पोलिसांकडून सखोल तपास सुरू असल्याचेही सांगितले.

सुवेंदू अधिकारी यांनी पुढे दावा केला की, केवळ चंद्रनाथ रथ यांच्यावरच नव्हे तर इतर भाजप कार्यकर्त्यांवरही अलीकडे हल्ले झाले आहेत. बसीरहाटमध्ये एका कार्यकर्त्यावर गोळीबार तर बारानगरमध्ये दुसऱ्या कार्यकर्त्यावर चाकूने हल्ला झाल्याचे त्यांनी नमूद केले. हा सर्व प्रकार एका मोठ्या कटाचा भाग असल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  आणि पक्ष नेतृत्वाला देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बुधवारी रात्री उशिरा मध्यमग्राम परिसरातील जेस्सोर रोडजवळ चंद्रनाथ रथ यांच्यावर दुचाकीस्वार हल्लेखोरांनी जवळून गोळीबार केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

भाजप नेत्यांच्या मते, या हल्ल्यात चार ते पाच मोटरसायकलींचा वापर करण्यात आला होता. वाहनात चालक उपस्थित असूनही केवळ चंद्रनाथ रथ यांनाच लक्ष्य करण्यात आल्याने हा लक्ष्यित हल्ला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, ममता बनर्जी  यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसनेही या घटनेचा निषेध केला असून न्यायालयीन देखरेखीखाली सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून जिवंत आणि रिकामी काडतुसे जप्त केली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.