पथविक्रेत्यांचा महापालिकेवर मोर्चा; आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की, परिसरात तणाव
सोलापूर : शहरातील पथविक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी
काढण्यात आलेल्या मोर्चाला बुधवारी तणावपूर्ण वळण लागले. कामगार संघटनेशी संलग्न
फेरीवाला संघटनेच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चादरम्यान आंदोलक आणि
पोलिसांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. काही आंदोलकांनी पोलिसांचा बंदोबस्त तोडून
महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत जाण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ
परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शहरातील फळ-भाजी विक्रेते, हातगाडीधारक, खोकेधारक
तसेच जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या पथविक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी सोलापूर
महानगरपालिका येथे हा मोर्चा काढण्यात आला होता. कामगार संघटनेचे राज्य
सरचिटणीस एम. एच. शेख आणि राज्य उपाध्यक्ष युसुफ शेख यांच्या
नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी अकरा वाजता दत्तनगर येथील लाल बावटा कार्यालयापासून
मोर्चाची सुरुवात करण्यात आली. मोठ्या संख्येने फेरीवाले आणि संघटनेचे कार्यकर्ते
या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा पुढे जात महानगरपालिकेसमोर पोहोचताच
पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये
काही काळ झटापट झाली. काही आंदोलकांनी पोलिसांचा बंदोबस्त तोडून महानगरपालिकेच्या
मुख्य प्रवेशद्वारापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आणि तेथे जोरदार घोषणाबाजी
करण्यात आली. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी संघटनेचे राज्य सरचिटणीस एम. एच. शेख यांनी सांगितले की, पथविक्रेत्यांच्या उपजीविकेचे संरक्षण करण्यासाठी केंद्र शासनाने कायदा
केला आहे. त्या कायद्यानुसार पथविक्रेत्यांची नोंदणी करणे, त्यांना
ओळखपत्र देणे तसेच विक्रीसाठी स्वतंत्र क्षेत्र निश्चित करणे ही महानगरपालिकेची
जबाबदारी आहे. पथविक्रेत्यांच्या हक्कांसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी
सांगितले.