सोलापूरच्या १,३५०.६७ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा डेन्मार्कसोबत सामंजस्य करार; महापौर विनायक कोंड्याल यांचा आनंद व्यक्त

सोलापूर : शहरातील नागरिकांना दररोज नियमित, स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने १,३५०.६७ कोटी रुपयांच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेसाठी डेन्मार्कसोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. डेन्मार्कचे परराष्ट्र मंत्री लार्स लॉके रासमुसेन, भारतातील डेन्मार्कचे राजदूत रासमुस अबिल्डगार्ड क्रिस्टेनसेन आणि डॅनिश इंडस्ट्रीचे प्रतिनिधी जेकब हार्टिग फेबर यांच्या उपस्थितीत हा करार झाला. सोलापूरच्या विकासातील या ऐतिहासिक क्षणाचा महापौर म्हणून साक्षीदार होता आले, याचा आनंद आणि अभिमान असल्याची भावना महापौर विनायक कोंड्याल यांनी व्यक्त केली.

१,३५०.६७ कोटींच्या योजनेमुळे पाणीप्रश्न सुटण्यास मदत

जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे सोलापूरकरांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यास मोठी मदत होणार आहे. शहरातील नागरिकांना नियमित, स्वच्छ आणि पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. विशेष म्हणजे, योजनेच्या पुढील दहा वर्षांच्या देखभाल व दुरुस्तीची (मेंटेनन्स) संपूर्ण जबाबदारी संबंधित कंपनीकडे राहणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्था अधिक नियमित आणि सक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वास महापौर कोंड्याल यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि आमदारांचे आभार

या योजनेला मंजुरी मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भक्कम पाठबळ लाभले. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन, तसेच सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा ठरल्याचे महापौरांनी सांगितले. या सर्व मान्यवरांचे समस्त सोलापूरकरांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करत असल्याचेही विनायक कोंड्याल यांनी नमूद केले.

डेन्मार्कचे प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचेही आभार

या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी सहकार्य व योगदान देणारे डेन्मार्कचे परराष्ट्र मंत्री लार्स लॉके रासमुसेन, भारतातील डेन्मार्कचे राजदूत रासमुस अबिल्डगार्ड क्रिस्टेनसेन, डॅनिश इंडस्ट्रीचे प्रतिनिधी जेकब हार्टिग फेबर आणि जागतिक बँकेचे आर्थिक सल्लागार प्रविणसिंह परदेशी यांचे महापौरांनी आभार मानले. तसेच सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे आणि या प्रकल्पाशी संबंधित सर्व पदाधिकारी व अधिकारी यांचेही त्यांनी विशेष आभार व्यक्त केले.