बार्शी तालुक्यातील नदी खोलीकरण व जलसंधारणाची कामे तातडीने सुरू करा; शेतकरी संघटनेची मागणी

बार्शी (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी आणि शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी नदी खोलीकरण, सरळीकरण व जलसंधारणाची प्रलंबित कामे तातडीने सुरू करावीत, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष शरद भालेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना सविस्तर निवेदन पाठवून ही मागणी केली आहे.

नदी खोलीकरण व सरळीकरणाची कामे करण्याची मागणी

बार्शी तालुक्यातील प्रमुख नद्या आणि ओढ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी शेतांमध्ये शिरून पिकांचे नुकसान होते, तर उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी नदी व ओढ्यांचे खोलीकरण आणि सरळीकरण तातडीने करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

प्रलंबित जलसंधारण प्रस्तावांना मंजुरी द्या

जिल्हा प्रशासनाने जलसंधारणाची कामे गतिमान करावीत. मंजूर असलेल्या जलसंधारण आणि सिंचनाच्या प्रस्तावांमधील प्रशासकीय व तांत्रिक अडथळे दूर करून त्यांना तातडीने मंजुरी द्यावी आणि प्रत्यक्ष कामांना सुरुवात करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जलसंधारणाची कामे केवळ एका विभागापुरती मर्यादित न ठेवता कृषी, वन, मृद व जलसंधारण, भूजल सर्वेक्षण व विकास, सामाजिक वनीकरण तसेच मनरेगा या यंत्रणांच्या समन्वयातून राबवावीत. विविध विभागांच्या निधीचे अभिसरण करून जलसंधारणाच्या कामांची व्याप्ती वाढवावी, असेही निवेदनात सुचविण्यात आले आहे.

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा

शासनाच्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या योजनेची सोलापूर जिल्ह्यासह बार्शी तालुक्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या योजनेमुळे धरणांची पाणी साठवण क्षमता वाढण्यासोबतच शेतकऱ्यांना सुपीक गाळ उपलब्ध होऊ शकतो. बार्शी तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना शाश्वत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रलंबित कामांचा आढावा घेऊन संबंधित विभागांना तातडीचे आदेश द्यावेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

कामे सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा

बार्शी तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन ही कामे तातडीने सुरू करावीत, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास सोलापूर जिल्हा तसेच राज्यस्तरीय कार्यालयांवर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शरद भालेकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.