टोलवर नंबर प्लेट झाकली किंवा फेरफार केला तर पाचपट दंड; फास्टॅग नसल्यासही कारवाई

नवी दिल्ली : देशातील बॅरियर-फ्री अर्थात अडथळामुक्त टोल प्रणालीमध्ये टोल शुल्क चुकवण्यासाठी वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये फेरफार करणे किंवा नंबर प्लेट झाकणे आता महागात पडणार आहे. अशा प्रकारे टोल चुकवणाऱ्या वाहनधारकांना मूळ टोल शुल्काच्या पाचपट रक्कम दंड म्हणून भरावी लागणार असल्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जाहीर केले आहे. तसेच वाहनावर फास्टॅग नसल्यासही कारवाई केली जाणार आहे.

नंबर प्लेटमध्ये फेरफार केल्यास पाचपट दंड

नवीन मल्टी-लेन फ्री फ्लो (MLFF) टोल प्रणाली लागू असलेल्या ठिकाणी हा नियम लागू होणार आहे. टोल शुल्क टाळण्यासाठी वाहनाची नंबर प्लेट झाकणे, तिच्यात फेरफार करणे किंवा ती लपवणे, तसेच फास्टॅग न लावता टोल चुकवण्याचा प्रयत्न करणे ही जाणीवपूर्वक केलेली फसवणूक मानली जाणार आहे. अशा प्रकारे टोल चुकवणाऱ्या वाहनधारकांना मूळ टोल शुल्काच्या पाचपट रक्कम दंड म्हणून भरावी लागेल. त्यामुळे वाहनधारकांनी आपल्या वाहनांची नंबर प्लेट स्पष्ट दिसेल अशा स्थितीत ठेवावी आणि टोल शुल्क नियमानुसार भरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

काय आहे मल्टी-लेन फ्री फ्लो टोल प्रणाली?

मल्टी-लेन फ्री फ्लो (MLFF) ही इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली आहे. या प्रणालीमध्ये रस्त्याच्या वर बसवलेले फास्टॅग रीडर्स आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन (ANPR) कॅमेऱ्यांच्या मदतीने वाहनांची ओळख पटवली जाते. त्यानंतर वाहनांचे टोल शुल्क आपोआप वसूल केले जाते.

या व्यवस्थेमुळे टोल भरण्यासाठी वाहनांना थांबण्याची गरज राहत नाही. परिणामी प्रतीक्षा वेळ कमी होतो, वाहतूक कोंडी टळते, इंधनाची बचत होते आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होते.

देशातील अनेक टोल प्लाझांवर प्रणाली लागू

देशातील पहिली मल्टी-लेन फ्री फ्लो प्रणाली मे महिन्यात गुजरातमधील चोरयासी टोल प्लाझावर सुरू करण्यात आली होती. त्यानंतर दिल्लीतील मुंडका, हरियाणातील घरौंडा, राजस्थानमधील दौलतपुरा, मनोहरपुरा आणि शाहजहांपूर, तसेच तामिळनाडूमधील पारनूर, नेमिली आणि चेनासमुद्रम या आणखी आठ ठिकाणी ही प्रणाली लागू करण्यात आली आहे. या प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे टोल महसुलातही मोठी वाढ झाल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.