लंगडत्या चालीने पोलिसांनी ओळखले ‘चुन्नू’ला; महिलांचे कपडे घालून घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

छत्रपती संभाजीनगर : ओळख लपवण्यासाठी कधी महिलांचे कपडे, तर कधी मंकी कॅप परिधान करून घरफोड्या करणाऱ्या एका सराईत आरोपीला त्याची लंगडत चालण्याची सवय चांगलीच महागात पडली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या याच लकबीवरून छत्रपती संभाजीनगरच्या गुन्हे शाखेने टोळीतील तिघांना ताब्यात घेतले. या कारवाईत सिडको आणि हर्सूल पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण ११ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी ७ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सीसीटीव्ही फुटेजमधील लंगडत्या चालीने ओळख पटली

नईम शहा उर्फ चुन्नू उस्मान शहा (वय ३७, रा. फकीरवाडी, कोळठाणवाडी रोड), सुभान शेख इसाक शेख (वय २२, रा. अल्तमश कॉलनी, रहीमनगर) आणि चोरीचे सोने खरेदी करणारा सराफ शेख मोहसीन शेख जाफर (वय ३६, रा. बायजीपुरा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ नोव्हेंबर रोजी एन-५ परिसरातील साने गुरुजी हाऊसिंग सोसायटीत राहणारे बळवंत पुंडलिक कोकणे यांच्या घरात घरफोडी झाली होती. या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये संशयिताने चेहरा आणि पेहराव लपवला होता. मात्र, तो लंगडत चालत असल्याचे स्पष्ट दिसत होते. नईम शहा उर्फ चुन्नू अशाच पद्धतीने चालतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तांत्रिक तपास आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून नईम आणि सुभानला ताब्यात घेतले.

व्यसन आणि दोन कुटुंबांचा खर्च भागवण्यासाठी चोऱ्या

पोलिसांच्या तपासात नईम शहा हा सराईत गुन्हेगार असून, त्याला दोन पत्नी आहेत आणि तो तीव्र व्यसनाच्या आहारी गेल्याचे समोर आले आहे. व्यसनाची गरज आणि दोन्ही कुटुंबांचा खर्च भागवण्यासाठी तो दीर्घकाळापासून चोऱ्या करत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. प्रत्येक चोरीनंतर तो साथीदार सुभानला ठराविक रक्कम देत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

७ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी हर्सूल परिसरातून चोरलेली दुचाकी (एमएच २० जीडी ६१६०), फकीरवाडी येथील दुसऱ्या पत्नीच्या घरी लपवून ठेवलेला ऐवज, तसेच शहागंज येथील सराफाकडून २० ग्रॅम सोने आणि चोरीचा टॅब असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या टोळीच्या अटकेमुळे सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नऊ आणि हर्सूल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन असे एकूण ११ गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपासासाठी तिन्ही आरोपींना सिडको पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वरिष्ठ निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक अर्जुन कदम आणि अंमलदार राजेंद्र साळुंके यांच्या पथकाने ही कारवाई केली.