सोलापूर महापालिकेचा ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम सुरू; अतिरिक्त आयुक्त विना पवार ई-रिक्षाने कार्यालयात दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब
करण्याबाबत केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेने ‘नो व्हेईकल
डे’ हा पर्यावरणपूरक उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत महानगरपालिकेतील
सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दर सोमवार हा
दिवस ‘नो व्हेईकल डे’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. या दिवशी खाजगी आणि शासकीय
वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतूक, सायकल, ई-वाहने किंवा पायी कार्यालयात येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. युद्धजन्य
परिस्थितीमुळे इंधनाच्या वाढत्या वापरावर नियंत्रण ठेवणे, पेट्रोल-डिझेलची
बचत करणे तसेच वाढते वायू प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ यावर नियंत्रण मिळवणे हा
या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. या
उपक्रमाला प्रत्यक्ष कृतीतून पाठिंबा देत अतिरिक्त आयुक्त श्रीमती विना पवार आणि
आरोग्याधिकारी श्रीमती राखी माने या सोमवारी ई-रिक्षाने सोलापूर महानगरपालिकेत
दाखल झाल्या. त्यांच्या या उपक्रमाचे कर्मचारी आणि नागरिकांकडून स्वागत करण्यात
आले. महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांनाही या पर्यावरणपूरक उपक्रमात सहभागी
होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने
जबाबदारी स्वीकारून सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करावा, असेही
प्रशासनाकडून सांगण्यात आले.