रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून हॉटेल कामगाराचा मृत्यू; सोलापुरातील शांतीनगरातील घटना
सोलापूर : शहरातील मार्केट यार्ड परिसरातील शांतीनगर येथे
रस्त्याच्या रुंदीकरणासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून एका हॉटेल कामगाराचा
दुर्दैवी मृत्यू झाला. गोरख मनोहर सकट (वय ३८) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
घरासमोरील ओट्यावरून उतरताना तोल गेला मिळालेल्या माहितीनुसार, गोरख सकट हे सकाळी उठल्यानंतर चहापाणी करून घरासमोरील ओट्यावरून खाली उतरत होते. त्याचवेळी अचानक त्यांचा तोल गेला आणि ते रस्त्याच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडले. या दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले. उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले घटनेनंतर कुटुंबीयांनी गोरख सकट यांना तातडीने सोलापूर येथील मार्कंडेय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे सकट कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा कुटुंबीयांचा आरोप दरम्यान, या घटनेनंतर सकट कुटुंबीयांनी रस्त्याच्या कामाशी संबंधित ठेकेदाराच्या कथित निष्काळजीपणावर गंभीर आरोप केले आहेत. रस्त्याच्या कामासाठी खोदलेले खड्डे बुजवावेत तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वारंवार करण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
संबंधितांवर कारवाईची मागणी ठेकेदाराच्या कथित हलगर्जीपणामुळे घरातील कर्त्या व्यक्तीचा जीव गेल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेनंतर परिसरातही नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती का, याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.