शिवसेनेचा धक्कातंत्र; ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील
शिवसेनेने धक्कातंत्राचा अवलंब करत पक्षाच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांना
राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. आनंदराव अडसूळ, गजानन कीर्तिकर, राहुल
शेवाळे आणि शायना एनसी यांसारख्या पक्षातील दिग्गज नेत्यांची नावं चर्चेत असताना
तुलनेने नवख्या असलेल्या ज्योती वाघमारे यांच्या गळ्यात राज्यसभेच्या उमेदवारीची
माळ पडली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी त्यांच्या नावावर
शिक्कामोर्तब करण्यात आले. ज्योती वाघमारे यांची थेट संसदेच्या वरिष्ठ सभागृहात
वर्णी लागल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सोलापूरच्या
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अभ्यासू आणि आक्रमक व्यक्तिमत्व म्हणून डॉ. ज्योती
वाघमारे यांची ओळख निर्माण झाली आहे. उच्च शिक्षणाच्या जोरावर समाजकारणात ठसा
उमटवणाऱ्या वाघमारे या शिवसेना पक्षाच्या मुख्य प्रवक्त्या म्हणून राज्यभर परिचित
आहेत. ज्योती वाघमारे यांनी दहावीत ८४ टक्के गुण मिळवले होते. बारावीत त्यांनी
पुणे विभागातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता.
इंग्रजी साहित्यात पीएचडी प्राप्त केलेल्या वाघमारे यांना महिलांच्या प्रश्नांवरील
संशोधनासाठी राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाला आहे. मराठी, हिंदी,
इंग्रजी यासह तेलुगू आणि कन्नड अशा पाच भाषांवर त्यांचे प्रभुत्व
आहे. अधिव्याख्याता म्हणून दहा वर्षांहून अधिक काळ त्यांनी काम केले आहे. मानवी
हक्क अभियान, विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि आंबेडकरी
चळवळीतून त्यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात केली होती. काही काळ त्यांनी
वृत्त निवेदिका म्हणूनही काम केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचा प्रसार
करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात
अनेक व्याख्यानं दिली आहेत. ज्योती वाघमारे यांना सामाजिक कार्याचा वारसा
त्यांच्या वडिलांकडून मिळाला आहे. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पँथरचे
सक्रिय कार्यकर्ते होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये वेटर
आणि बांधकाम मजूर म्हणूनही काम केले. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत
सोलापूरच्या जनतेने त्यांना नगरसेवक म्हणून निवडून दिले होते. वडिलांच्या सामाजिक
कार्याचा वारसा ज्योती वाघमारेंनी पुढे चालवला.