महापालिकेच्या गोडाऊनमधून भंगार बाहेर नेताना प्रकार उघड; नगरसेवक अमोल शिंदे यांनी पकडली गाडी
सोलापूर महानगरपालिका इमारतीच्या
मागील बाजूस असलेल्या स्टोअर गोडाऊनमधून शहरातून जप्त करून आणलेले भंगार एका खाजगी
वाहनातून बाहेर नेत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार नगरसेवक अमोल शिंदे
यांनी प्रत्यक्ष पकडल्याने महापालिका प्रशासनात खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, जप्त केलेला भंगार माल एका खाजगी गाडीमधून बाहेर नेला
जात असल्याची माहिती मिळताच नगरसेवक अमोल शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत वाहन
अडवले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका अकुलवार, सभागृह नेते नरेंद्र काळे तसेच नगरसेवक सात्विक बडवे, विनायक विटकर आणि किरण पवार यांनी घटनास्थळी भेट देत
गाडीची पाहणी केली.
या प्रकारामुळे उपस्थित
पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. महापालिकेच्या ताब्यातील
जप्त माल नेमका कोणाच्या परवानगीने बाहेर नेला जात होता, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पथक
घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे आणि नगरसेवक अमोल शिंदे
यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना
पोलिसांना दिल्या. या घटनेमुळे महापालिकेच्या
मालमत्तेच्या सुरक्षेवर आणि देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन पुढे कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष
लागले आहे.