सोलापूरमध्ये माकपचे आंदोलन, हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध; पोलिसांनी दोन्ही गटांना ताब्यात घेतले
सोलापूर शहरात इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर निषेध आंदोलन झाले. माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (माकप) कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयाच्या ‘पूनम गेट’ परिसरात आंदोलन पुकारले. पोलिस प्रशासनाने कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत परवानगी नाकारली होती. तरीही माकप कार्यकर्त्यांनी काळे कपडे परिधान करून आंदोलन सुरू ठेवत घोषणाबाजी केली. यावेळी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच ‘नेतान्याहू मुर्दाबाद’च्या घोषणांसह ट्रम्प आणि नेतान्याहू यांचा पुतळा जाळण्यात आला. “युद्धविराम त्वरित करा,” अशी मागणी आंदोलकांनी केली.
हिंदुत्ववादी संघटनांचा प्रतिवाद
माकपचे आंदोलन सुरू असतानाच हिंदुत्ववादी कार्यकर्ते
मोठ्या संख्येने तेथे जमले. त्यांनी इस्रायलच्या समर्थनार्थ आणि माकपच्या विरोधात
घोषणाबाजी केली. दोन्ही गट आमनेसामने आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला.
परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून
दोन्ही बाजूंच्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, देवंद्र कोठे यांनी सोशल
मीडियावरून इस्रायलला समर्थन दिल्याचे सांगितले जात आहे. परवानगी नसताना आंदोलन
केल्याप्रकरणी आणि पुतळा दहन केल्याबाबत पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई
होण्याची शक्यता आहे. सध्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून
परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.