संविधान बचाव रॅलीत प्रणिती शिंदेंचा भाजपवर निशाणा; ‘संविधानाच्या रक्षणासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत लढा’
संविधान दिनानिमित्त ठाणे येथील संविधान चौकात काँग्रेस पक्षाच्या
वतीने राज्यस्तरीय ‘संविधान बचाव रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र
प्रदेश काँग्रेस कमिटीचे एआयसीसी प्रभारी डॉ. सिरीवेल्ला प्रसाद यांच्या प्रमुख
उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही रॅली पार
पडली. खासदार प्रणिती शिंदे यांनीही या रॅलीत सहभाग नोंदवला. या रॅलीमध्ये
राज्यभरातून आलेले काँग्रेसचे नेते, आमदार, खासदार, पदाधिकारी तसेच संविधानावर निष्ठा आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणारे
हजारो नागरिक सहभागी झाले होते. संविधानाच्या रक्षणासाठी कटिबद्ध असल्याचा संदेश
यावेळी देण्यात आला.
‘संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच
राहील’
यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी संविधानाच्या रक्षणाबाबत काँग्रेस
पक्षाची भूमिका मांडली. भाजपकडून वारंवार संविधानाचा अवमान केला जात असल्याचा आरोप
त्यांनी केला. भाजप संविधान, तिरंगा आणि लोकशाही मूल्यांना मानत नसल्याची टीकाही
त्यांनी केली. काँग्रेसचे विचार मानणारे, सर्वधर्मसमभावावर
विश्वास ठेवणारे आणि संविधानवादी विचारांचे नागरिक संविधानाच्या रक्षणासाठी
गल्लीपासून दिल्लीपर्यंत लढा देत आहेत, असे त्या म्हणाल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाचे रक्षण करणे ही
प्रत्येकाची जबाबदारी आहे. काँग्रेसचा विचार जिवंत असेपर्यंत हा संघर्ष सुरूच
राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मतदार यादी पुनरीक्षण आणि मतचोरीवरून केंद्र सरकारला सवाल
संसदेचे हिवाळी अधिवेशन जवळ आले असतानाही केंद्र सरकारने अद्याप अधिवेशनाची तारीख जाहीर केलेली नाही किंवा त्यासंदर्भातील अधिसूचना काढलेली नाही, असा मुद्दा प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला. विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR), मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची भूमिका आणि मतचोरीच्या मुद्द्यांवर काँग्रेस संसदेत आवाज उठवणार असल्याने केंद्र सरकार अधिवेशन टाळत असल्याचा आरोप त्यांनी केला.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरूनही भाजपवर टीका
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर भाजपने बहुमत मिळवण्यासाठी रडीचा डाव
खेळल्याचा आणि लोकशाही मूल्ये पायदळी तुडवल्याचा आरोपही प्रणिती शिंदे यांनी केला.
भाजपला सत्ता झेपली नाही आणि पराभवही पचवता आला नाही, अशी
टीका त्यांनी केली. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर घडलेल्या घटनांमधून लोकशाही
मूल्यांची कशी पायमल्ली झाली, हे महाराष्ट्राने पाहिले आहे,
असे त्या म्हणाल्या.