बुलेट पार्किंगवरून वाद; मध्यस्थी करणाऱ्या युवकाची चाकूने हत्या, टेंभूर्णीतील धक्कादायक घटना

सोलापूर : गाडी पार्किंग करण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत होऊन एका युवकाचा चाकूने हल्ला करून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना टेंभूर्णी येथील नाळेवस्ती परिसरात घडली. नागनाथ मच्छिंद्र जाधव (वय ४१, रा. वेणेगांव, ता. माढा) असे मृत युवकाचे नाव आहे. १ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजता ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, नाळेवस्ती येथे सद्दाम पटवारी यांच्या घरासमोरील पार्किंगच्या जागेत वाहन लावण्यावरून सद्दाम पटवारी आणि संशयित आरोपी राज कदम यांच्यात वाद सुरू झाला होता. हा वाद सोडवण्यासाठी नागनाथ जाधव यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

मध्यस्थी केल्याचा राग आल्याने संशयित आरोपींनी नागनाथ जाधव यांना शिवीगाळ करून खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर वाद आणखी वाढला. समाधान चौधरी आणि सागर कुटे यांनी सोबत आणलेल्या चाकूने नागनाथ जाधव यांच्या पाठीवर आणि मांडीवर वार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. चाकूच्या हल्ल्यात नागनाथ जाधव गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी टेंभूर्णी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकलूज येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत सद्दाम पटवारी हे देखील जखमी झाले आहेत. घटनेनंतर आरोपी वाहनातून घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी मृत नागनाथ जाधव यांचे भाऊ महेश मच्छिंद्र जाधव (वय ३९, रा. वेणेगांव) यांनी टेंभूर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून राज कदम, समाधान चौधरी, रणजीत पवार (तिघे रा. टेंभूर्णी), सागर कुटे (रा. वेणेगांव) आणि अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश बावकर यांनी प्राथमिक कारवाई केली आहे. पुढील तपास करमाळा विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा करत आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून, लवकरच संशयितांना ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. नागनाथ जाधव हे पिकअप चालक म्हणून काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले आणि आई-वडील असा परिवार आहे. भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या नागनाथ जाधव यांचा या घटनेत हकनाक बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वेणेगांव येथे सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.