मुंबई–पुणे एक्स्प्रेस वे पुन्हा ठप्प; ३२ तासांच्या कोंडीनंतरही प्रवाशांचा संयम सुटण्याच्या मार्गावर

मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी हा मार्ग सध्या डोकेदुखी ठरत आहे. गेल्या तब्बल ३२ तासांपासून सुरू असलेली वाहतूक कोंडी अजूनही संपलेली नाही. आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटल्याने निर्माण झालेली परिस्थिती निवळते न निवळते, तोच लोणावळ्याजवळ सिमेंट कंटेनर बंद पडल्याने महामार्ग पुन्हा एकदा ठप्प झाला आहे. सध्या लोणावळ्याच्या अलीकडे सुमारे २० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या संथ रांगा पाहायला मिळत असून, मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक सर्वाधिक प्रभावित झाली आहे.

गॅस टँकरनंतर सिमेंट कंटेनरचा फटका मंगळवारी आडोशी बोगद्याजवळ प्रोपेलीन वायू वाहतूक करणारा गॅस टँकर पलटी झाला होता. ज्वलनशील वायूची गळती सुरू झाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. महामार्ग पोलीस, रायगड जिल्हा पोलीस, फायरब्रिगेड, एनडीआरएफ, बीपीसीएल, हेल्प फाउंडेशन तसेच केमिकल एक्सपर्ट्स यांच्या अथक प्रयत्नांनंतर ३२ तासांनी गॅस गळती थांबवून टँकर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आला. मात्र ही कोंडी सुटण्याच्या आधीच तळेगाव ते मळवली दरम्यान मुंबईच्या दिशेने जाणारा एक सिमेंट कंटेनर अचानक बंद पडला, ज्यामुळे वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली.

२ किमी अंतरासाठी तासभर प्रतीक्षा सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून, फक्त २ किमी अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना तासभराहून अधिक वेळ लागत आहे. महामार्गावर सुमारे ११ ते १२ किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
थंडीमध्ये अडकलेले प्रवासी, अन्न-पाण्याविना लहान मुले आणि वृद्ध नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

प्रशासन काय करतंय?

प्रशासनाकडून बंद पडलेला सिमेंट कंटेनर हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी काही हलकी वाहने जुन्या मुंबई–पुणे महामार्गावरून वळवण्यात येत आहेत.
मात्र, कंटेनर पूर्णपणे हटेपर्यंत वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, महामार्ग प्रशासनाने प्रवाशांना अत्यावश्यक नसल्यास या मार्गाने प्रवास टाळण्याचे आवाहन केले असून, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.