कुसळंबमध्ये धक्कादायक प्रकार; अल्पवयीन प्रेयसीचा छळामुळे आत्महत्येनंतर मृतदेह शेतात पुरला

कुसळंब :- बार्शी तालुक्यातील कुसळंब परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून पुण्यातून पळवून आणलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली, तर प्रकरण अंगलट येईल या भीतीने तिच्या प्रियकराने मृतदेह शेतात पुरल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २९ जानेवारी २०२६ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी बार्शी तालुका पोलिसांनी अभिषेक आश्रुबा बांगर आणि त्याची आई सोजरबाई बांगर (दोघे रा. मुंडेवाडी, जि. बीड) यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि पुरावा नष्ट करणे या गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातून पळवून आणले फिर्यादीत मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांची मुलगी शिक्रापूर (पुणे) येथे नातेवाइकांकडे राहत होती. १६ जुलै २०२५ रोजी ती बेपत्ता झाली होती. तपासादरम्यान समोर आले की, आरोपी अभिषेक बांगर याने तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. यानंतर तो तिला बार्शी तालुक्यातील तुर्कपिंपरी येथील साखर कारखान्यावर ऊसतोडीच्या कामासाठी घेऊन आला. दोघे कारखान्यावरील खोपीत (झोपडीत) राहू लागले. स्वयंपाक व कामावरून छळ मुलीला स्वयंपाक येत नाही, ऊसतोडीचे काम जमत नाही, या कारणावरून अभिषेक आणि त्याची आई सोजरबाई यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. सततच्या जाचाला कंटाळून १३ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ ते १४ जानेवारी पहाटे ४ वाजेदरम्यान तिने खोपीत ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मृतदेह शेतात पुरला आत्महत्येची माहिती मिळताच पोलिस कारवाईच्या भीतीने आरोपी मायलेकांनी मुलीचा मृतदेह बैलगाडीत घालून तुर्कपिंपरी साखर कारखान्याजवळील एका शेतात नेऊन खड्डा खणून पुरून टाकला. पैंजणांवरून ओळख २९ जानेवारी २०२६ रोजी त्या शेतात एका मुलीचा अर्धवट अवस्थेतील मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुलीच्या वडिलांशी संपर्क साधला. त्यांनी मुलीच्या पायातील पैंजणांवरून तिची ओळख पटवली. संशयावरून आरोपी अभिषेकला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने छळ आणि मृतदेह पुरल्याची कबुली दिली. त्यानंतर आईसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसणे करत आहेत.