अकलूजमध्ये इलेक्ट्रिक दुचाकीमुळे भीषण आग; घर, कार आणि दुकान जळून खाक

सोलापूर :-  सोलापूर जिल्ह्यातील अकलूज शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इलेक्ट्रिक दुचाकी चार्जिंगदरम्यान झालेल्या छोट्याशा चुकीमुळे भीषण आग लागून घर, चारचाकी गाडी आणि मशिनरीचे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले आहे. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून संबंधित कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे.

नेमकं काय घडलं?

प्राप्त माहितीनुसार, अकलूज शहरातील महावीर पथ परिसरात ही घटना घडली. या ठिकाणी सुहास गांधी यांचे राहते घर आणि मशिनरीचे दुकान आहे. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद केल्यानंतर गांधी यांनी त्यांची इलेक्ट्रिक दुचाकी घराच्या परिसरात चार्जिंगला लावली. मात्र चार्जिंग पूर्ण झाल्यानंतर चार्जर काढणे आणि स्विच बंद करणे ते विसरले. मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीची बॅटरी ओव्हरहीट झाली आणि त्यातून शॉर्ट सर्किट होऊन दुचाकीने अचानक पेट घेतला. आगीचे रौद्र रूप रात्रीची वेळ असल्याने घरातील सर्वजण गाढ झोपेत होते. काही क्षणांतच दुचाकीला लागलेली आग शेजारी उभ्या असलेल्या चारचाकी कारपर्यंत पोहोचली. आगीच्या ज्वाळा एवढ्या भयानक होत्या की, पाहता पाहता त्या मशिनरीच्या दुकानात आणि राहत्या घरात पसरल्या. धुराचे लोट आणि आगीचे तांडव पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीने उग्र रूप धारण केल्याने सर्व काही जळून खाक झाले. होत्याचे नव्हते झाले या आगीत राहते घर, मशिनरीचे दुकान, महागडी यंत्रसामग्री, चारचाकी कार आणि इलेक्ट्रिक दुचाकी पूर्णपणे नष्ट झाली. गांधी कुटुंबाचे उत्पन्नाचे मुख्य साधन असलेले दुकान जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही एकमेव दिलासादायक बाब ठरली आहे. नागरिकांना खबरदारीचे आवाहन एका छोट्याशा निष्काळजीपणामुळे आयुष्यभराची कमाई आगीत भस्मसात झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराच्या पार्श्वभूमीवर, चार्जिंग करताना योग्य खबरदारी घेणे, दर्जेदार वायर व चार्जर वापरणे आणि चार्जिंग पूर्ण झाल्यानंतर स्विच बंद करणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.