नाशिक महापालिकेत राजकीय खळबळ; शहराध्यक्ष सुनील केदारांचा तडकाफडकी राजीनामा
नाशिक महापालिका निवडणुकीत उमेदवारी वाटप आणि पदनियुक्ती प्रक्रियेत घोळ झाल्याच्या आरोपांनंतर भाजपला मोठा धक्का बसला आहे. शहराध्यक्ष सुनील केदार यांनी महापौर व उपमहापौरपदाचे उमेदवार जाहीर होताच आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. पुढील व्यवस्था होईपर्यंत आपण काम पाहणार असल्याचे त्यांनी पक्षनेत्यांना कळवले आहे. प्रदेश पक्षनेत्यांकडून निश्चित करण्यात आलेली नावे डावलून इतरच उमेदवार जाहीर करण्यात आल्याचा दावा केदार यांनी केला आहे. या निर्णयामुळे भाजपच्या अंतर्गत गोटात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. उमेदवार निवडीत वाद नाशिकच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी अनेक इच्छुक होते. त्यात अनुभवी नगरसेवकांसह नव्याने राजकारणात आलेले चेहरेही होते. महापालिका निवडणुकीदरम्यान उमेदवारी वाटपावरून आधीच पक्षात गोंधळ झाला होता. त्यावेळी पक्षशिस्त पाळणाऱ्यांनाच पदे दिली जातील, अशी भूमिका सुनील केदार यांनी मांडली होती. यानंतर स्थानिक कोअर कमिटी आणि इच्छुक उमेदवारांशी चर्चा करून चार नावे प्रदेश कोअर कमिटीकडे पाठवण्यात आली होती. त्यापैकी दोन नावे मंगळवारी जाहीर होणार होती.
बैठकीत काय घडलं?
मंगळवारी सकाळी इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील एका तारांकित
हॉटेलमध्ये भाजप नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश
महाजन उपस्थित होते. त्यांनी मुंबईतील प्रदेश नेत्यांशी संपर्क साधल्यानंतर अंतिम
नावे आल्याचे सांगितले. मात्र, प्रदेश कार्यालयाकडे पाठवलेल्या
नावांऐवजी महापौरपदासाठी हिमगौरी आडके आणि उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांची
नावे जाहीर करण्यात आली. यामुळे सुनील केदार प्रचंड नाराज झाले.
‘ती दोन नावे कोणाची?’
स्थानिक भाजपकडून पाठवलेल्या चार नावांपैकी दोनच जाहीर करण्यात आली. उर्वरित दोन नावे कोणाची होती, याबाबत गिरीश महाजन यांनी मौन बाळगले आहे. केदार यांच्या राजीनाम्यानंतर ही नावे कोणाची होती, याची चर्चा आता अधिक तीव्र झाली आहे. मुख्यमंत्र्यांना संदेश उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर सुनील केदार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र पाठवले असल्याची माहिती आहे. गेली ४१ वर्षे पक्षासाठी काम करत असताना अशा प्रकारचा अनुभव पहिल्यांदाच आला, असा दावा त्यांनी पत्रात केल्याचे समजते. या घडामोडींमुळे नाशिक भाजपमध्ये अंतर्गत मतभेद उघडकीस आले असून, पुढील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.