विलीनीकरणाबाबत फडणवीसांच्या वक्तव्यानंतर शरद पवारांचे कडक शब्दांत प्रत्युत्तर; थेट म्हणाले “या सर्व चर्चेत ते…”
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात
मोठ्या घडामोडींना वेग आला असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षांच्या विलीनीकरणाबाबत नेत्यांकडून दावे–प्रतिदावे
सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून बैठका घेऊन
विलीनीकरणाबाबत तारीख ठरल्याचे संकेत देण्यात आले होते. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत विलीनीकरणाची शक्यता फेटाळून
लावली होती.
नेमकं काय म्हणाले होते मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की,
“जर विलीनीकरणाचा मुद्दा असता, तर अजित पवारांनी मला सांगितलं असतं. त्याची कल्पना मला दिली असती. मग ते
एनडीएसोबत आले असते का?” तसेच, “अजित
पवार आणि शरद पवार यांच्यात विलीनीकरणाबाबत नेमकं काय बोलणं झालं, हे मला माहिती नाही. कोणतीही तारीख ठरली होती, याची
माहितीही मला नाही,”
असेही फडणवीसांनी स्पष्ट केले होते. अजित पवार आणि आपले वैयक्तिक
संबंध चांगले होते आणि मृत्यूच्या आदल्या दिवशी दोघांमध्ये तासभर चर्चा झाली होती,
असेही त्यांनी सांगितले.
शरद पवारांचे कडक प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. “फडणवीस यांनी माझं नाव घ्यायचा काय संबंध आहे? या
सगळ्या चर्चेत ते कुठेच नव्हते. त्यामुळे यावर भाष्य करण्याचा त्यांना काही अधिकार
आहे, असं मला वाटत नाही,” अशा शब्दांत
शरद पवारांनी फडणवीसांवर निशाणा साधला.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर प्रतिक्रिया
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा
पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर शरद पवार यांनी पहिल्यांदाच
प्रतिक्रिया दिली. “सुनेत्रा पवारांना संधी मिळाली, याचा मला आनंद आहे. त्या उपमुख्यमंत्री झाल्या म्हणून मी त्यांना खुशीने
आशीर्वाद देईन,”
असे पवार म्हणाले. मात्र, त्यांच्या
शपथविधीच्या राजकीय पार्श्वभूमीवर भाष्य करणे टाळत,
“या विषयावर अधिक बोलायचं नाही,”
असेही त्यांनी स्पष्ट केले.