लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना दिलासा; तीन महिन्यांचे ४५०० रुपये एकत्र मिळणार
राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या
लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. तांत्रिक अडचणींमुळे रखडलेले
नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे एकूण
४५०० रुपये आता एकत्रित स्वरूपात मिळणार आहेत. ही महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील प्रचारसभेत केली.
ई-केवायसी त्रुटींमुळे थांबलेले पैसे मिळणार गेल्या तीन महिन्यांपासून अनेक महिलांना ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेतील त्रुटींमुळे योजनेचा लाभ मिळू शकलेला नव्हता. यामुळे लाभार्थी महिलांमध्ये नाराजी पसरली होती. यावर स्पष्टीकरण देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “ज्या बहिणींचे पैसे तांत्रिक कारणांमुळे थांबले आहेत, त्यांनी काळजी करू नये. अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रक्रिया पूर्ण होताच पात्र महिलांच्या खात्यात तीन महिन्यांचे पैसे एकाच वेळी जमा होतील.” २१०० रुपये देण्याच्या आश्वासनाचे संकेत यावेळी बोलताना शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देण्याचे दिलेले आश्वासनही लवकरच पूर्ण होईल, असे संकेत दिले. “लाडकी बहीण ही माझी अत्यंत आवडती योजना आहे. माझ्या आईच्या प्रेरणेतून ही संकल्पना जन्माला आली. मला केवळ मदत नाही, तर माझ्या राज्यातील बहिणींना लखपती होताना पाहायचे आहे,” असे भावनिक वक्तव्य त्यांनी केले. विरोधकांवर टीका या सभेदरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवरही जोरदार टीका केली. “आम्ही बहिणींना आर्थिक बळ देत आहोत, पण काही लोक केवळ टीका करत आहेत. स्वतः काही दिले नाही आणि आम्ही देतोय, तर त्यावरही आक्षेप घेतले जात आहेत,” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला. शेतकऱ्यांनाही दिलासा याच भाषणात शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती गठीत करण्यात आली असून, अहवाल प्राप्त होताच त्याची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला जाईल, असेही स्पष्ट केले.