माउलींच्या पालखी सोहळ्यासाठी सातारा विभागाकडून जादा एसटी बसेस; लोणंद, फलटणसह मुक्कामस्थळी विशेष नियोजन

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त सातारा विभागाच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) भाविकांच्या प्रवासासाठी विशेष नियोजन केले आहे. पालखीच्या मुक्कामस्थळी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन जादा बससेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी विभागाच्या नियोजनानुसार, पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी प्रवाशांच्या गरजेनुसार टप्प्याटप्प्याने अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार आहेत. १५ जुलै रोजी लोणंद येथे ८५ जादा बसेस, १६ जुलै रोजी तरडगाव येथे १० बसेस, १७ जुलै रोजी फलटण येथे ८५ बसेस आणि १८ जुलै रोजी बरड येथे १० जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांना सुरक्षित, वेळेत आणि सुरळीत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यादरम्यान प्रवाशांची संख्या वाढल्यास गरजेनुसार आणखी बसेस उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती सातारा विभागाच्या विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी दिली. एसटी महामंडळाने पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांना नियोजित बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले असून, वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.