स्कूल बसवर झाड कोसळून विहानचा मृत्यू; क्रिकेट बॅट हातात घेऊन मुलाची वाट पाहणाऱ्या आईचा हृदयद्रावक आक्रोश

मुंबईतील चेंबूर परिसरात स्कूल बसवर झाड कोसळून झालेल्या भीषण अपघातात ११ वर्षीय विहान श्रीवास्तव याचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून विहानच्या आईची मन हेलावून टाकणारी अवस्था सर्वांनाच हळहळून टाकणारी ठरत आहे. अपघातानंतर काही तास उलटल्यानंतरही विहानची आई जुही श्रीवास्तव मुलाची क्रिकेट बॅट हातात घेऊन शून्यात हरवलेल्या अवस्थेत बसल्याचे दृश्य समोर आले. तिला अजूनही विश्वास आहे की, विहान शाळेतून घरी परत येईल आणि नेहमीप्रमाणे क्रिकेट खेळण्यासाठी बाहेर जाईल. शेजाऱ्यांच्या माहितीनुसार, विहानला क्रिकेटची प्रचंड आवड होती. व्यावसायिक क्रिकेटपटू बनण्याचे त्याचे स्वप्न होते. तो शेजारील मुलांकडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यासाठी नियमित जात असे. अभ्यासात हुशार आणि सुसंस्कृत म्हणूनही त्याची ओळख होती. शेजाऱ्यांनी सांगितले की, विहान हा आईसाठी सर्वस्व होता. तो घराबाहेर असला की आई सतत व्हिडिओ कॉल करून त्याची चौकशी करत असे. या अचानक घडलेल्या दुर्घटनेचा मानसिक धक्का तिला सहन करणे अत्यंत कठीण जात आहे. या अपघातात बसमधील इतर चार विद्यार्थी जखमी झाले. विद्यार्थ्यांनी सांगितले की, अचानक मोठा आवाज झाला आणि झाडाची मोठी फांदी बसवर कोसळली. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत मुलांना बसमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यापैकी काहींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. या दुर्घटनेनंतर शाळा बसची सुरक्षितता, पावसाळ्यात धोकादायक झाडांचे व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.