चार दिवसांपासून बेपत्ता वाहतूक पोलिसाचा पोलादपूरमधील लॉजमध्ये मृत्यू; सुसाईड नोटमधून कौटुंबिक कलहाचा उल्लेख
सातारा : वाई तालुक्यातील ओझर्डे येथील वाहतूक पोलीस संतोष रामचंद्र ननावरे
(वय ३६) हे चार दिवसांपूर्वी घरातून निघून गेले होते. त्यानंतर रायगड
जिल्ह्यातील पोलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजमध्ये त्यांचा मृतदेह
आढळून आला. या घटनेमुळे सातारा जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलिसांना
घटनास्थळी सुसाईड नोटही आढळली असून, त्यामध्ये कौटुंबिक वादाचा उल्लेख असल्याचे तपास
अधिकाऱ्यांनी सांगितले.
लॉजच्या खोलीत मृतावस्थेत आढळले
संतोष ननावरे हे बेपत्ता झाल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील काळकाई
हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या जोगळे लॉजमध्ये वास्तव्यास होते. शुक्रवारी सकाळी
लॉजमधील कर्मचारी त्यांना आंघोळीसाठी पाणी देण्यासाठी खोलीकडे गेला. त्याने दरवाजा
ठोठावून हाका मारल्या. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर
खिडकीतून पाहिले असता ननावरे हे मृतावस्थेत आढळले. लॉज कर्मचाऱ्यांनी तातडीने
पोलादपूर पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली
माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सतीश पवार घटनास्थळी दाखल झाले.
नातेवाईकांना घटनेची माहिती देऊन घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यानंतर खोलीचा
दरवाजा उघडून मृतदेह खाली उतरवण्यात आला. पोलिस कर्मचारी असल्याने महाडचे
डीवायएसपी प्रदीप काळे आणि पोलादपूरचे सहायक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांनीही
घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
सुसाईड नोटमध्ये कौटुंबिक वादाचा उल्लेख
तपासादरम्यान पोलिसांना संतोष ननावरे यांनी लिहिलेली सुसाईड नोट
मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. या नोटमध्ये कौटुंबिक वादाचा उल्लेख असल्याची
माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सतीश पवार यांनी दिली. पत्नी नांदायला येत
नसल्याने दोघांमध्ये सातत्याने वाद होत असल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद असल्याचे
पोलिसांनी सांगितले आहे.
पत्नी, सासू आणि मेहुणीबाबतही उल्लेख
सुसाईड नोटमध्ये पत्नी, तिची बहीण आणि सासू यांच्याबाबतही आरोप करण्यात
आल्याचे वृत्त आहे. पत्नीच्या आईच्या सांगण्यावरून पत्नी वाद घालत असल्याचा तसेच
वारंवार पैशांची मागणी होत असल्याचा उल्लेख नोटमध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे.
या सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
ओझर्डे येथे अंत्यसंस्कार
शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संतोष ननावरे यांचा मृतदेह
नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर मृतदेह त्यांच्या मूळ गावी ओझर्डे
येथे आणण्यात आला. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या
प्रकरणाची पोलादपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस
उपनिरीक्षक सतीश पवार पुढील तपास करत आहेत.