विकास लवांडे यांच्यावर शाईफेक व धक्काबुक्की; संग्राम भंडारे समर्थकांवर आरोप

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकून धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली असून या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात लवांडे यांनी थेट संग्राम महाराज भंडारे आणि त्यांच्या समर्थकांवर हल्ल्याचा आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी मातोबा येथे कार्यक्रम आणि प्रवचन आटोपल्यानंतर विकास लवांडे परतत होते. आज सकाळी सुमारे दहाच्या सुमारास काही जणांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग करून गाडी अडवली. त्यानंतर त्यांच्या अंगावर काळी शाई फेकण्यात आली तसेच धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाला असून त्यामध्ये संग्राम महाराज भंडारे आणि त्यांच्या समर्थकांकडून शाईफेक झाल्याचा दावा केला जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना संग्राम महाराज भंडारे यांनी, “वारकरी संप्रदायावर टीका करताना विकास लवांडे यांनी ‘घुसखोर’ असा शब्द वापरला होता. गुरुवर्यांविषयी अशा प्रकारची भाषा वापरणे चुकीचे आहे,” असे म्हटले आहे. घटनेबाबत बोलताना विकास लवांडे यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, काही जणांनी त्यांच्या वाहनाला अडवून शाईफेक केली, धक्काबुक्की केली तसेच पिस्तूल दाखवून धमकावले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याचा आरोप त्यांनी केला.

घटनेनंतर विकास लवांडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच आरोपींवर तातडीने कारवाई न झाल्यास लोणी काळभोर पोलीस ठाण्यासमोर सत्याग्रह करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासले जात आहेत. संबंधित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.