हरभऱ्याच्या भाजीला चांगला दर

बोरेगाव, दि. २-
पोषक वातावरणामुळे व वाढत्या थंडीमुळे रब्बी हंगामातील हरभरा पीक
बहरले असून ग्रामीण भागातील महिला हरभऱ्याच्या शेंडा खुडण्यात व्यस्त आहेत. सध्या
बाजारात हरभऱ्याच्य भाजीला प्रतिकिलो शंभर ते एकशे वीस रुपये इतके दर मिळत आहे. ऊस, कांदा,
उडीद, मूग आदी पिकांची काढणी झाल्यानंतर
शेतकरी हरभरा या पिकाची पेरणी करतात. काही शेतकरी उसाच्या फडात अंतर पीक म्हणून
हरभरा पिकाची लागवड करतात. रब्बी हंगामात हरभरा फुलात येण्याअगोदर महिला हरभरा
पिकाची शेंडा खुडतात. शेंडा खुडल्याने पिकाची वाढ चांगली होते व जोमाने फुटवे
फुटतात. त्यामुळे शेतकरी कुटुंबातील महिला आवर्जून त्याचा शेंडा खुडतात. शिवाय
वाळवून त्याच्या भाजीसाठी वर्षभर वापर करता येतो. हा दुहेरी लाभ त्यामागे आहे.
साधारणपणे ऑक्टोबर महिना संपला की, भाजी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होते. ताज्या भाजीला
चांगली मागणी असते. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, तुळजापूर आदी तालुक्यातील शेतकरी
मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाची पेरणी करतात. यावर्षी थंडी वाढल्याने पीक जोमात आहे.
बागायती क्षेत्रात त्याला पाणीही दिले जात आहे. अनेक शेतकरी वाट्याने म हिलांना
शेंडा खुडू देतात. भाजीच्या विक्रीतून महिलांना चांगले उत्पन्न मिळत आहे.
हिवाळ्यात बाजारात हिरव्या भाज्या उपलब्ध असतात. भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे,
खनिजे आदी अनेक जीवनावश्यक घटक असतात. त्यामुळे आरोग्यतज्ज्ञ
नागरिकांना हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला देतात. सोलापूर शहरातील मार्केट यार्ड,
लक्ष्मी व कस्तुरबा मंडईत हरभरा भाजी उपलब्ध आहे. या भाजीला शहरी
भागात चांगली मागणी आहे.