भोकरदन तालुक्यातील सालगडीचा मुलगा चार्टर्ड अकाऊंटंट; राजू कोलतेने उजळवलं गावाचं नाव
महाराष्ट्र मधील जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील
क्षीरसागर गावातील राजू कोलते याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत चार्टर्ड
अकाऊंटंट (CA) परीक्षेत यश मिळवले आहे. राजूचे वडील
किसनराव कोलते गेली सुमारे ४० वर्षे भोकरदन येथील शेतात सालगडी म्हणून काम करत
आहेत. आई सुनंदाबाई शेतीमजुरी करून संसाराला हातभार लावतात. घरची आर्थिक परिस्थिती
अत्यंत हलाखीची असतानाही कुटुंबातील प्रत्येकाने जबाबदारी उचलली. मोठा भाऊ गजानन
दुकानात काम करून भावंडांच्या शिक्षणासाठी मदत करत होता. उच्च शिक्षणासाठी लागणारा
खर्च परवडत नसतानाही गावातील शेतकरी विनायक औटी यांनी आर्थिक मदत केली. त्या
पाठबळामुळे राजूने शिक्षणाची वाट सोडली नाही. अखेर १ मार्च रोजी जाहीर झालेल्या
निकालात त्याने चांगल्या गुणांनी CA परीक्षा उत्तीर्ण केली. निकाल
लागल्यानंतर राजूने शेतात काम करत असलेल्या आई-वडिलांना आनंदाची बातमी दिली. ‘सीए
म्हणजे काय?’ याची पूर्ण कल्पना नसतानाही मुलाच्या कष्टाचे
फळ मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. राजूच्या यशाबद्दल गावात
सत्कार करण्यात आला. प्रतिकूल परिस्थितीतून जिद्द, मेहनत आणि
चिकाटीच्या जोरावर मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण परिसरात त्याचे कौतुक होत आहे.
एका सालगडीच्या मुलाने मोठं स्वप्न पाहून ते पूर्ण केल्याने अनेक
विद्यार्थ्यांसाठी तो प्रेरणास्थान ठरला आहे.