‘मौका सभी को मिलता है’; अमोल शिंदे यांच्या पराभवावर पालकमंत्री जयकुमार गोरेंचे सूचक वक्तव्य
सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत निवडून
आलेल्या सर्व विजयी उमेदवारांसह नूतन संचालक मंडळाचे पालकमंत्री जयकुमार गोरे
यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, माजी
आमदार प्रशांत परिचारक, दिलीप माने, राजन
पाटील, दीपक साळुंखे-पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेते
उपस्थित होते.
अमोल शिंदे यांच्या पराभवावर सूचक वक्तव्य
अभिनंदन कार्यक्रमानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी
संवाद साधला. नागरी बँका व पतसंस्था मतदारसंघात मनीष देशमुख आणि अमोल शिंदे
यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. यावर
प्रतिक्रिया देताना गोरे यांनी, “मौका सभी को मिलता है,” असे
सूचक वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर त्यांनी या लढतीवर अधिक भाष्य करणे टाळले.
मात्र, त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू
झाली आहे.
मनीष देशमुख यांनी अमोल शिंदे यांचा केला पराभव
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत नागरी बँका व
पतसंस्था मतदारसंघातून मनीष देशमुख यांनी अमोल शिंदे यांचा पराभव केला होता. या
दोघांमधील लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या निकालाच्या
पार्श्वभूमीवर पालकमंत्री गोरेंनी केलेले ‘मौका सभी को मिलता है’ हे वक्तव्य
चर्चेचा विषय ठरले आहे.