सोलापूरात महात्मा बसवेश्वर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; सर्कल सुशोभीकरणासाठी ५० लाखांची तरतूद
सोलापूर – मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव व समाजसेवा महामंडळाच्या
वतीने सालाबादप्रमाणे महात्मा बसवेश्वर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना मल्लिकार्जुन
मंदिर येथील आवरू मठासमोर उत्साहात पार पडली. यावेळी उमरग्याचे आमदार श्री. प्रवीण
स्वामी व सोलापूरचे महापौर श्री. विनायक कोंड्याल यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर
महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास माजी आमदार शिवशरण पाटील, प्रताप
चव्हाण, नगरसेवक अक्षय अंजीखाने ,सिद्धरामप्पा
अब्दुलपुरकर, महेश धाराशिवकर, दत्ता
माने, राम वाकसे, सागर आतनुरे आदी
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी महामंडळाच्या उत्सव समितीचे अध्यक्ष
शरण राज केंगनाळकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी महापौर श्री. विनायक कोंड्याल म्हणाले की, “महात्मा
बसवेश्वरांनी समाजाला समानता, बंधुता आणि सत्याचे मूल्य
दिले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.
सोलापूर शहरात बसवेश्वरांच्या नावाने असलेल्या सर्कलचे सुशोभीकरण करून ते एक आदर्श
स्थळ बनविण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे.”
तसेच महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी महात्मा बसवेश्वर सर्कलच्या
सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपयांचा निधी अंदाजपत्रकात तरतूद केल्याबद्दल महामंडळाच्या
वतीने ट्रस्टी अध्यक्ष जगदीश पाटील यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार
करण्यात आला. समस्त वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने महापौरांचा गौरव करण्यात आला.