नागपूरहून चेन्नई आणि पुण्यासाठी नवी विमानसेवा; ३० नोव्हेंबरपासून एअर इंडिया एक्स्प्रेसची उड्डाणे
नागपूरहून चेन्नई आणि पुण्यासाठी थेट हवाई जोडणी
नागपूर : नागपूरकर प्रवाशांसाठी चेन्नई आणि पुणे मार्गावर
नवी विमानसेवा सुरू होणार आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसने ३० नोव्हेंबरपासून
नागपूरहून चेन्नई आणि पुण्यासाठी विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
आठवड्यातील सातही दिवस ही सेवा उपलब्ध राहणार आहे. नागपूर ते पुणे मार्गावर एअर
इंडिया एक्स्प्रेसची ही पहिलीच विमानसेवा ठरणार आहे. कंपनीने बुधवारी या नव्या
सेवेची अधिकृत घोषणा केली. सध्या चेन्नई ते पुणे दरम्यान सुरू असलेल्या
विमानसेवेचा विस्तार नागपूरपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूरहून चेन्नईला
जाणाऱ्या प्रवाशांना पुण्यात विमान बदलण्याची आवश्यकता राहणार नाही. एकाच विमानाने
प्रवास पूर्ण करता येणार असल्याने प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.
१८० आसनक्षमतेचे एअरबस A320 विमान
या मार्गावर १८० आसनक्षमता असलेले एअरबस A320 विमान तैनात केले जाणार आहे. विमानातील सर्व आसने इकॉनॉमी क्लासची असतील.
या प्रवासासाठी सुरुवातीचे तिकीट दर ६ हजार ९८८ रुपये ठेवण्यात आले आहेत.
असे असेल चेन्नई-पुणे-नागपूर विमानाचे वेळापत्रक
आयएक्स २६६१ क्रमांकाचे विमान रात्री ९.५५ वाजता
चेन्नईहून उड्डाण करेल. रात्री ११.४५ वाजता ते पुण्यात पोहोचेल. पुणे विमानतळावर
३५ मिनिटांच्या थांब्यानंतर मध्यरात्री १२.२० वाजता नागपूरकडे रवाना होईल. पहाटे
१.५५ वाजता नागपूर विमानतळावर त्याचे आगमन होईल.
परतीच्या प्रवासाचे वेळापत्रक
आयएक्स २६६० क्रमांकाचे विमान मध्यरात्री २.४० वाजता
नागपूरहून उड्डाण करेल. पहाटे ४.१५ वाजता ते पुण्यात पोहोचेल. त्यानंतर सकाळी ५.१०
वाजता चेन्नईकडे रवाना होऊन सकाळी ६.५५ वाजता चेन्नई विमानतळावर दाखल होईल.
नागपूर-पुणे प्रवासासाठी आणखी एक पर्याय
या नव्या विमानसेवेमुळे नागपूर-पुणे प्रवासासाठी
प्रवाशांना आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. तसेच दक्षिण भारतातील महत्त्वाचे
व्यावसायिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय केंद्र असलेल्या
चेन्नईशी नागपूरची हवाई जोडणी अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.