अहिल्यानगरमध्ये पोलिस हवालदारावर जमावाचा हल्ला; १५ जणांविरोधात गुन्हा, तिघे अटकेत
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे पोलिस कर्मचाऱ्यावर
१५ जणांच्या जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जमावाने पोलिस
हवालदाराला बेदम मारहाण करत त्यांच्या अंगावरील कपडे फाडले. इतकेच नव्हे तर
जमावातील एका व्यक्तीने मोठा दगड उचलून त्यांच्या दिशेने फेकल्याचा प्रकारही समोर आला
आहे. या घटनेमुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील मनमाड महामार्गावरील डिग्रस फाटा येथे काही व्यक्ती
मद्यप्राशन करून ट्रक चालकाला लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत
होते. त्यावेळी राहुरी पोलिस ठाण्यातील हवालदार विकास वैराळ हे तेथून जात असताना
त्यांनी गर्दी पाहून वाहन थांबवले आणि ट्रक चालकाला मारहाण करणाऱ्यांना रोखण्याचा
प्रयत्न केला. मात्र जमावाने त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ आणि दमदाटी केली.
त्यानंतर हा वाद तात्पुरता शांत झाला. पण रात्री साडेअकराच्या सुमारास राहुरी शहरातील
एका चौकात बंदोबस्तावर असताना तोच जमाव पुन्हा वैराळ यांच्या समोर आला. यावेळी
जमावाने पुन्हा शिवीगाळ करत लोखंडी गज, लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी
त्यांच्यावर हल्ला केला. मारहाण इतकी तीव्र होती की वैराळ यांच्या अंगावरील कपडे
फाडले गेले. काहींनी त्यांच्या चेहऱ्यावर ठोसे मारले, तर
काहींनी त्यांना पळवून मारहाण केली. परिस्थिती गंभीर होत असताना जमावातील एका
व्यक्तीने मोठा दगड उचलून त्यांच्या दिशेने फेकल्याचीही माहिती समोर आली आहे. या
संपूर्ण घटनेचा व्हिडिओ काही जणांनी मोबाईलवर चित्रित केला असून तो सध्या समाज
माध्यमांवर वेगाने प्रसारित होत आहे. या हल्ल्यात हवालदार विकास वैराळ गंभीर जखमी
झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान,
या प्रकरणी वैराळ यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात १५
जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये खंडू वसंत काळे, वैभव बाबासाहेब तारडे, संतोष अंकुश काळे आणि महेश
निमसे यांच्यासह इतर अकरा जणांचा समावेश आहे. पोलिसांनी खंडू काळे, वैभव तारडे आणि संतोष काळे या तिघांना अटक केली असून घटनेत वापरलेले
चारचाकी वाहन जप्त केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक समाधान फडोळ करीत
आहेत.