वाढदिवसाच्या दिवशी २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या; मोबाईलसाठी पैसे न दिल्याने टोकाचे पाऊल
सिंधुदुर्ग : अलीकडे आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत
असल्याचे दिसत आहे. अशीच एक दुर्दैवी घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात घडली आहे. २२ वर्षीय तरुणाने आपल्या
वाढदिवसाच्या दिवशीच आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्यन सुभाष
रवंदे (वय २२, रा. जामसंडे सहकारनगर) असे आत्महत्या केलेल्या
तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महागडा नवीन
मोबाईल खरेदी करण्यासाठी आईने पैसे न दिल्याच्या रागातून आर्यनने राहत्या घरातील
हॉलमध्ये गळफास घेतला.
ही घटना गुरुवारी (५ मार्च) रात्री सुमारे ११.२०
वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी तातडीने
आर्यनला जामसंडे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना
त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन हा आईसोबत जामसंडे सहकारनगर येथे स्वतःच्या घरात राहत होता. त्याची
आई मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होती. आर्यन देखील वेल्डिंगसह विविध मोलमजुरीची
कामे करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत होता. ५ मार्च रोजी त्याचा वाढदिवस
असल्याने त्याने महागडा मोबाईल खरेदी करण्यासाठी आईकडे पैशांची मागणी केली होती.
मात्र आईने पैसे देण्यास नकार दिल्याने तो रागावला आणि त्यातूनच त्याने गळफास घेऊन
आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले, अशी प्राथमिक माहिती समोर
आली आहे. या घटनेचा पंचनामा देवगड पोलीस स्टेशन
च्या पोलिसांनी केला आहे. देवगड ग्रामीण
रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर आर्यनचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात
आला. त्याच्या मूळ गावी इचलकरंजी येथे
पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घरातील कर्ता मुलगा गमावल्याने आईने एकच
आक्रोश केला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी देवगड पोलीस
ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.