‘किमान वेतन नको, रोजगाराची शाश्वती द्या’; विडी कामगारांचा संताप
सोलापूर : विडी कामगारांना हजार विडीमागे ३७९ रुपये किमान वेतन
देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, या निर्णयाला सोलापूर विडी
उद्योग संघाने विरोध करत १ सप्टेंबरपासून कारखाने बंद करून उद्योग इतर राज्यात
स्थलांतरित करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सोलापुरातील विडी कामगारांमध्ये
अस्वस्थता निर्माण झाली आहे. कारखानदारांनी उद्योग बंद
करण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी विडी कामगार आणि कारखान्यातील
कर्मचाऱ्यांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी
‘आम्हाला किमान वेतन नको, रोजगाराची शाश्वती हवी’ अशा
घोषणा देत कामगारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
‘कारखाने बंद करू नका’
आंदोलनादरम्यान महिला विडी
कामगारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. “आम्हाला किमान वेतन नको. सध्या
मिळणाऱ्या २४५ रुपयांच्या मजुरीवर आम्ही समाधानी आहोत; मात्र कारखाने बंद करू नका,” अशी मागणी त्यांनी केली. कारखाने इतर राज्यात स्थलांतरित झाल्यास हजारो
कामगारांचा रोजगार धोक्यात येईल, अशी भीती कामगारांनी व्यक्त
केली. विशेषतः विडी उद्योगावर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न
निर्माण होण्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
‘रोजगार गेला तर कामगार नेते
रोजगार देणार का?’
“कारखाने बंद झाले आणि आमचा
रोजगार गेला, तर कामगार नेते आम्हाला रोजगार
देणार आहेत का?” असा सवाल संतप्त महिला
कामगारांनी उपस्थित केला. किमान वेतनाच्या निर्णयापेक्षा
सध्या आपला रोजगार टिकणे अधिक महत्त्वाचे असल्याचे कामगारांनी सांगितले. कारखाने
बंद होऊ नयेत आणि विडी उद्योग सोलापुरातून स्थलांतरित होऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.
दोन-तीन दिवसांत कारखानदारांची
बैठक
दरम्यान, कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन सहाय्यक कामगार
आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांना देण्यात आले. कामगारांच्या प्रश्नावर चर्चा करून
तोडगा काढण्यासाठी येत्या दोन ते तीन दिवसांत विडी कारखानदारांची बैठक घेण्यात
येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. या बैठकीतून किमान वेतनाचा निर्णय आणि कारखानदारांचा
उद्योग स्थलांतरित करण्याचा इशारा या दोन्ही मुद्द्यांवर तोडगा निघतो का, याकडे आता विडी कामगारांचे लक्ष लागले आहे.