अकलूजमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ; उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील लहान मुलासह मतदानासाठी उपस्थित

अकलूज येथील यशवंत नगर मतदान केंद्रावर मतदानादरम्यान एक गोंधळाची घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील हे आपल्या लहान मुलाला सोबत घेऊन मतदान केंद्रावर आले होते. यावेळी मतदान केंद्राध्यक्षांनी लहान मुलाला मतदान केंद्रात आणल्याबाबत आक्षेप घेतला. माहितीनुसार, रुद्रराज अर्जुनसिंह मोहिते पाटील असे त्या लहान मुलाचे नाव असून, तो मतदान केंद्रात उपस्थित असल्याने काही काळ संभ्रम निर्माण झाला. या मुलाने मतदान केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला, मात्र याबाबत कोणताही अधिकृत पुरावा समोर आलेला नाही. या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना अर्जुनसिंह मोहिते पाटील म्हणाले की, “आई-वडील मतदान करताना कसे मतदान करतात हे बघायचे म्हणून मुलाला सोबत आणले होते. मतदान प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार करण्यात आलेला नाही.”

दरम्यान, निवडणूक प्रक्रियेत नियमांचे पालन होणे आवश्यक असल्याने, मतदान केंद्रातील शिस्त आणि नियमांबाबत उपस्थित अधिकाऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी, नंतर परिस्थिती नियंत्रणात आली.