मुंबई मनपाच्या महापौरपदी रितू तावडे, उपमहापौरपदी संजय घाडी यांची निवड
गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेच्या
महापौरपदी कोणाची निवड होणार, हे पद भाजपकडे जाणार की शिवसेनेला मिळणार,
याबाबत जोरदार चर्चा सुरू होत्या. अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम
मिळाला असून, मुंबई मनपाच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडे
यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी
रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केली. त्याचवेळी उपमहापौरपदासाठी शिवसेनेकडून
नगरसेवक संजय घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. उपमहापौरपदाचा कालावधी सव्वा
वर्षांचा असणार आहे. शिवसेना (शिंदे गट) खासदार राहुल शेवाळे यांनी
उपमहापौरपदासाठी प्रभाग क्रमांक ४ मधील नगरसेवक संजय घाडी यांच्या नावाची घोषणा
केली. या निर्णयामुळे मुंबई महापालिकेतील सत्तासमीकरणे स्पष्ट झाली असून, भाजप-शिवसेना युतीतील समन्वय पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. महापौर
म्हणून निवड झालेल्या रितू तावडे या प्रभाग क्रमांक १३२ मधील नगरसेविका आहेत. त्या
आतापर्यंत दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या असून, त्यांनी
यापूर्वी मुंबई मनपाच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे.
तसेच त्या स्थापत्य समितीच्या उपाध्यक्ष देखील राहिल्या आहेत. ईशान्य मुंबईतील एक आक्रमक
आणि ठाम नेतृत्व म्हणून रितू तावडे ओळखल्या जातात. वीज दरवाढीविरोधात त्यांनी
यापूर्वी आक्रमक आंदोलन केले होते. त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वगुणांचा मुंबई
महापालिकेच्या कारभाराला लाभ होईल, असा विश्वास भाजपकडून
व्यक्त करण्यात आला आहे.