श्रद्धा आणि प्रेमाचा संगम पत्नीच्या प्रेमा पोटी पती आला सिलेंडर घेऊन
श्रद्धा असेल तर कोणताही आजार आडवा येत नाही, याचा प्रत्यय बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील ऐतिहासिक चिंचली मायाक्का देवीच्या यात्रेदरम्यान आला. महाराष्ट्रातील पंढरपूर येथील एक वृद्ध दाम्पत्य गंभीर श्वसनाच्या आजाराशी झुंज देत असतानाही ऑक्सिजन सिलिंडरच्या आधारावर देवीच्या दर्शनासाठी चिंचली येथे पोहोचले, आणि हा प्रसंग पाहून भाविकांचे डोळे पाणावले. पंढरपूर येथील संभाजी पाटील आणि सखुबाई पाटील हे दाम्पत्य मायाक्का देवीच्या दर्शनासाठी चिंचली येथे आले होते. सखुबाई पाटील या श्वसनाच्या गंभीर आजारामुळे त्रस्त असून, त्यांना सतत ऑक्सिजनची गरज होती. ऑक्सिजन सिलिंडरची नळी नाकाला लावलेली असताना, पती संभाजी पाटील स्वतः सिलिंडर हातात धरून पत्नीला आधार देत मंदिरात घेऊन गेले. प्रत्येक पावलावर पतीने आजारी पत्नीस आधार दिला. मंदिरात प्रवेश करताना आणि देवीच्या दर्शनावेळी दोघांमधील परस्पर प्रेम, विश्वास आणि आधार पाहून उपस्थित भाविक भारावून गेले. अनेकांनी हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.
आजारावर मात करत दर्शनाचा निर्धार
माहितीनुसार, आठवडाभरापूर्वी सखुबाई पाटील यांची
प्रकृती गंभीर झाली होती. त्या गेल्या पाच ते सहा दिवस
रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र, दरवर्षी मायाक्का
देवीचे दर्शन घेणे ही त्यांच्या कुटुंबाची जुनी परंपरा असल्याने, आरोग्याची पर्वा न करता त्यांनी दर्शनाचा निर्धार केला.डॉक्टरांच्या
सल्ल्यानंतर आवश्यक खबरदारी घेत त्यांनी चिंचली गाठली. देवीसमोर कृतज्ञतेने
प्रार्थना केल्यानंतर हे दाम्पत्य सुखरूपपणे पुन्हा पंढरपूरकडे रवाना झाले.
भक्तीचा आदर्श
आजारपणावर मात करत श्रद्धेच्या बळावर मंदिरापर्यंत
पोहोचलेल्या या वृद्ध दाम्पत्याने भक्ती, धैर्य आणि पती-पत्नीतील निखळ प्रेमाचा
आदर्श भाविकांसमोर उभा केला आहे.